स्मगलर मांजरी

नॉर्थ इस्ट ब्राझीलमधील तुरूंगात नवीन वर्षाच्या सुरवातीलाच घडलेली ही घटना. त्याचे झाले असे की पहार्याधवर असलेल्या तुरूंगरक्षकांना एक मांजरी तुरूंगात येताना दिसली. मुख्य दारातून सरळ आत प्रवेश केलेली ही मांजरी थोडी वेगळी वाटली म्हणून सजग झालेल्या रक्षकाने जरा बारकाईने तिला न्याहाळले आणि तो आश्चर्यचकीतच झाला.

पांढर्या  शुभ्र रंगाच्या या मनीमाऊच्या अंगावर टेपने कांहीतरी बांधले असल्याचे रक्षकाच्या लक्षात आले. त्याने त्वरीत मांजरी पकडली आणि टेप सोडविली. तेव्हा काय आढळले असेल? कांही अंदाज बांधता येतोय? नाही? मग ऐका-

या मांजरीच्या अंगावर टेपच्या सहाय्याने मोबाईल फोन, करवत, छोटेसे ड्रील मशीन, इअरफोन, मेमरी कार्ड, फोनची बॅटरी, फोन चार्जर इतक्या वस्तू बेमालूम बांधण्यात आल्या होत्या आणि या मनीबाई त्या वस्तू घेऊन कदाचित तुरूंगातील त्यांच्या मालकापर्यंत पोहोचविणार होत्या. रक्षकाने मध्येच तिला अडविल्याने ती नक्की कुठल्या बराकीत जाणार होती याचा शोध घेणे आता पोलिसांना प्राप्त बनले आहे. कारण ज्या शहरात हा तुरूंग आहे तेथली लोकसंख्या आहे तब्बल दोन लाखांपेक्षा अधिक. या कटात नक्की केाण सामील होते आणि ही मनीमाऊ अशी स्मगलर बनविण्याचे काम कुणी केले, त्याला कोण जबाबदार याचा तपास पोलिसांना लावायचा आहे.

पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे ही नवीनच डोकेदुखी झाली आहे. या वस्तू घेऊन एखादा माणूस आत घुसला असता तर लगेच त्याचा जबाब घेता आला असता. आता मांजर कांही बोलू शकत नाही. आणि समजा बोलत असली तरी तिच्या मालकाशिवाय तिची भाषा कळणार कुणाला? उलट इतक्या वस्तू तिच्या अंगावर बांधल्याने मांजरीला जखमा झाल्या आहेत आणि उपचारासाठी तिला रूग्णालयात दाखल करावे लागले आहे. तोही खर्च पोलिसांवर पडणार ते वेगळेच.

Leave a Comment