हेलिकॉप्टर घोटाळयाप्रकरणी ब्रिटन सहकार्य करणार

नवी दिल्ली: इटालियन कंपनी ओगस्टावेस्टललँडशी हेलिकॉप्टर खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाबाबत भारताची तीव्र प्रतिक्रिया ब्रिटनचे प्रधानमंत्री डेव्हिड कॅमेरॉन यांच्यापर्यंत पोहोचविली असून या प्रकरणी संपूर्ण सहकार्याचे आश्वासन कॅमेरॉन यांनी दिल्याचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले.

इटलीतील संरक्षण साहित्याची प्रमुख उत्पादक कंपनी असलेल्या फिनमेक्कानिका या कंपनीची उपकंपनी असलेल्या ओगस्टावेस्टललँडच्या हेलिकॉप्टर्सचे उत्पादन ब्रिटनमधे केले जाते. भारताने अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी १२ केलिकॉप्टर्स खरेदीचा करार या कंपनीबरोबर सन २०१० मध्ये केला. मात्र या ३ हजार ६०० कोटी रुपयांच्या या व्यवहारात सुमारे ३६० कोटी रुपयांची लाच दिल्याचे प्रकरण पुढे आले आणि या प्रकरणी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकार्याला इटलीत अटक झाली. त्यानंतर हा करार भारताने रद्द केला आहे. भारतातही केंद्रीय अन्वेषण विभाग या लाच प्रकरणाची चौकशी करीत आहे.

या प्रकरणी चौकशीसाठी भारताला ब्रिटनकडून जी माहिती आवश्यक असेल; ती तत्काळ उपलब्ध करून दिली जाईल; अशी ग्वाही कॅमेरॉन यांनी या पत्रकार परिषदेत दिली. इटालियन तपास यंत्रणा या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

ब्रिटनमध्ये लवकरंच लाच प्रतिबंधक विधेयक मांडण्यात येणार असून हा कायदा जगातील लाच प्रतिबंधक कायद्यात सर्वाधिक कडक कायदा असेल आणि कोणतेही लाचेचे प्रकरण घडल्यास आम्ही त्याची पाळेमुळे उखडून टाकल्याशिवाय राहणार नाही; असेही कॅमेरॉन यांनी सांगितले.

Leave a Comment