नवी दिली: हेलिकॉप्टर घोटाळ्यात दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. मात्र त्यामुळे संरक्षण साहित्याच्या प्रत्येक व्यवहाराबाबत साशंकता निर्माण करून सैन्यदलांच्या आधुनिकीकरणात बाधा आणू नका; असे आवाहन संरक्षण मंत्री ए. के. अॅन्थोनी यांनी विरोधकांना केले.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावरच हेलिकॉप्टर घोटाळा उघडकीला आल्यामुळे विरोधकांकडून होणार्या संभाव्य भडीमाराला तोंड देण्यासाठी सरकारने मोर्चेबांधणी चालू केली आहे. या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्र्यांनी विरोधकांना हे आवाहन केले.
हेलिकॉप्टर घोटाळ्याच्या तपासाचा केंद्रीय अन्वेषण विभागाचा अहवाल संसदेसमोर सादर केला जाईल. मात्र देशाचे शेजारी उपद्रवी आहेत. त्यामुळे भारतीय सैन्यदलांचे वेगाने अत्याधुनिकीकरण होणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व व्यवहारांबाबत शंका घेऊ नका; असेही संरक्षण मंत्र्यांनी सांगितले.
हेलिकॉप्टर घोटाळ्याची जबाबदारी घेऊन आपण राजीनामा देणार असल्याचा मात्र अॅन्थोनी यांनी इन्कार केला. काही वर्षाच्या कालावधीत मध्यस्थाचा वापर केल्याबद्दल आणि लाचखोरीबद्दल संरक्षण विभागाने ६ कंपन्यांना काळ्या यादीत समाविष्ट केल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.