काल नरेन्द्र मोदी दिल्लीत आले. ते आले, त्यांनी पाहिले आणि ते जिंकले अशी त्यांची ही दिल्ली धडक होती पण त्यामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता वाढली आहे. मोदी यांनी दिल्लीतल्या श्रीराम कॉमर्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांपुढे प्रभावी भाषण केले. गुजरातचा विकास कसा झाला आहे आणि तसाच देशाचा विकास कसा करता येईल यावर त्यांनी प्रभावी भाषण केले. त्यांच्या तासाभराच्या भाषणात त्यांनी निदान २५ वेळा तरी टाळ्या घेतल्या. टाळ्या वाजवणारे काही भाजपाचे कार्यकर्ते नव्हते. ते तर भारताचे नौजवान कर्तबगार तरुण होते. त्यांच्या मनाला मोदी यांनी नक्कीच मोहिती घातली आहे.
२०१४ साली होणार्या लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान कोण होणार हा प्रश्न आता चर्चेला आलाच आहे आणि त्याबाबत राहुल गांधी आणि नरेन्दा्र मोदी यांच्यातच चुरस आहे हेही आता उघड होत आहे. त्यामुळे मोदी यांनी दिल्लीत येऊन केलेले भाषण आणि राहुल गांधी यांचे भाषण यात तुलना होणार आहे आणि होतही आहे. अर्थात नरेन्द्र मोदी यांचे भाषण राहुल गांधी यांच्या निरस आणि दुसर्यांलनी लिहून दिलेल्या भाषणापेक्षा किती तरी सरस होते. त्यात तर त्यांनी राहुल गांधी यांच्यावर मात केली आहे. या भाषणाचे अजून एक वैशिष्ट्य होते. ते म्हणजे मोदी यांनी जे काही बोलून दाखवले ते सारे आधी करून दाखवले आहे.
राहुल गांधी यांचे तसे नाही. त्यांच्या भाषणाला कामाचा काही आधार नाही. किंबहुना ते काहीही काम न करताच बोलत असतात आणि पुढेही ते काही करू शकतील की नाही याविषयी साशंकता आहे. काँग्रेस पक्षाने राहुल गांधी यांना पुढे करून देशातल्या तरुण आणि मध्यमवर्गीय मतदारांना आकृष्ट करण्याचा डाव टाकला आहे पण मोदींचे दिल्लीतले भाषण तर याच मतदारांना आकर्षित करणारे ठरले आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांचा जळफळाट झाला आहे. काँग्रेसचे नेते मोदी यांच्यावर तुटून पडायला सुरूवात झाली आहे. तसे ते याहीपूर्वीं तेच काम करीत होते. पण मोदी हे जसजसे दिल्लीच्या जवळ सरकत आहेत तसतशी काँग्रेस नेत्यांची ही तडफड तीव्र होत आहे.
काँग्रेसच्या दोघा प्रवक्त्यांनी मोदी यांच्या दिल्लीतल्या भाषणावर आगपाखड सुरू केली आहे. ती करताना या दोघांनीही २००२ सालच्या गुजरातेतल्या दंगलींची आठवण करून दिली आहे. खरे तर तशी आठवण करून द्यायचीच झाली तर काँगसवाल्याना त्यानी १९८४ साली दिल्लीत केलेल्या शिखांच्या शिरकाणाचीही आठवण करून द्यावी लागेल. मोदींच्या गुजरातेत २००२ साली दंगली झाल्या पण त्यानंतरच्या अकरा वर्षात गुजरातेत एकही दंगल झाली नाही याची आठवण हे काँग्रसचे नेते का करून देत नाहीत त्यांनी करून नाही दिली तरीही जनतेला हे माहीत आहे.
आता मोदी यांची विकासाला चालना देणारा नेता अशी प्रतिमा तयार केली जात आहे आणि काँग्रेसला ती घातक आहे. आता काँग्रेसच्या नेत्यांनी कितीही आगपाखड केली तरी काहीही उपयोग होणार नाही. भाजपाने आता मोदींचा विकास आणि रामाचे मंदिर असा दुहेरी अजेंडा तयार केला आहे. दोन दिवसांपूर्वी उत्तरांचलाचे माजी मुख्य मंत्री भाजपाचे नेते भुवनचंद्र खंडुरी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भारतीय जनता पार्टी आगामी निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करणार, असे सूचित केले. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या मनात तसा विचार येण्यास काही कारणे आहेत.
उत्तर भारतामध्ये उत्तरांचल आणि हिमाचल प्रदेश या दोन राज्यात भाजपाच्या हाती सत्ता होती आणि ती नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकां मध्ये त्यांच्या हातून गेली आहे. या दोन्ही राज्यात भाजपाचे प्रशासन चांगले होते, असा त्या पक्षाचा दावा आहे. मग हिमाचल आणि उत्तरांचल या दोन राज्यामध्ये भाजपाच्या हातून सत्ता का गेली? त्याच बरोबर उत्तर प्रदेशात भाजपाला यश का मिळत नाही? या राज्यात रामाचाच मुद्दा हाती घ्यावा लागणार आहे.
माजी मुख्यमंत्री कल्याणसिंग यांना आता पक्षात घेतलेले आहे. पूर्वी कल्याणसिंग पक्षात असतानाच उत्तर प्रदेशात भाजपाची घसरण सुरू झाली होती. म्हणजे कल्याणसिंग आल्याने आता फार मोठा फरक पडणार नाही. मग भाजपाला पुन्हा लोकसभेमध्ये १७५ पेक्षा अधिक जागा मिळवायच्या असतील तर नव्वदच्या दशकामध्ये खेळलेले राम मंदिराचे कार्डच पुन्हा खेळले गेले पाहिजे असे भाजपाच्या नेत्यांना वाटत आहे. निवडणुका, मतदान आणि राजकारण यांचा विचार करता भाजपाची ही चाल त्या पक्षाच्या इतिहासाला धरूनच आहे. म्हणून आता अलाहाबादच्या संगमावर कुंभमेळ्याचे निमित्त करून हिंदुत्वाचे राजकारण खेळले जायला लागले आहे.
अलाहाबाद हे ठिकाणही उत्तर प्रदेशात आहे. कल्याणसिंगही पक्षात आलेले आहेत आणि पक्षाचे नवे अध्यक्ष राजनाथ सिंग हेही उत्तर प्रदेशातीलच आहेत. त्यांनी तिथे गंगेत स्नान केले. गंगेत उडी मारल्यानंतर राम मंदिराचे स्वप्न पुरे व्हावे, अशी प्रार्थना केली. विश्व हिंदू परिषदेशी संबंधित असलेल्या साधू-संन्याशांनी सुद्धा गंगा मैय्यापेक्षा राम नामाचाच जप जास्त वेळा केला. एकंदरीत मोदींनी विकास आणि अन्य नेत्यांनी राम असा दुहेरी अजेंडा समोर ठेवलेला आहे.