बनावट नोटा रोखण्यास अक्षम सरकारी यंत्रणा

पुणे:ˆ तेलगीच्या काळात पुण्या-मुंबईतच देशाची बनावट नोटा आणि खोटे स्टॅम्प यांचे मुख्यालय झाले होते. आता पुन्हा देशभर विदेशी बनावट नोटा पसरल्या आहेत. भारतात शेजारी देशाकडून होणार्‍या बनावट नोटांच्या चोरट्या आयातीने देशातील अर्थव्यवस्था बर्‍याच अंशी खिळखिळी झाली असल्याचे वृत्त डेली मेलने दिले आहे.

एका बाजूला कर्नाटकात तेथील एक सामाजिक कार्यकर्ते जयंत तिनईकर यांनी बंगलोर उच्च न्यायालयात याबाबतची एक जनहित हित याचिका दाखल केली आहे तर दुसर्‍या बाजू पुण्यातील एक उद्योजक अनिल काळे यांनी बनावट नोटा शोधण्याची निरनिराळी यंत्रे तयार करून केंद्रीय गृह मंत्रालय, रिझर्व्ह बँक, स्टेट बँक, सीबीआय, सर्व राज्यांच्या पोलीस यंत्रणा व न्यायालयांना मान्य अशा प्रयोगशाळा यांना पुरविली आहेत त्यातून देशभर येत असलेल्या बनावट नोटांच्या महापुरावर नियंत्रण ठेवण्याचे काम सुरु झाले आहे.

डेली मेलने त्यांच्या अभ्यासक टीमच्या आधारे केलेल्या पाहणीनुसार भारतात बनावट नोटा पुरविणार्‍या क्षेत्रात दुबई, पाकिस्तानातील क्वेट्टा आणि काश्मीरमधील एका अज्ञात ठिकाणाचा समावेश आहे. पण दक्षिण भारतात ज्या नोटा येतात ते बँकॉकयेथे छापलेल्या बनावट नोटा येतात. त्या प्रामुख्याने श्रीलंकामार्गे व भारताच्या पाच हजार किमीपेक्षाही अधिक विस्तीर्ण सागरी किनार्‍यावरून येतात.

गेल्या एका वर्षात जी अफाट महागाई वाढली आहे; प्रामुख्याने घरांच्या किमती वाढत आहेत; त्याला बाजारपेठेत शिरलेली बनावट नोटा कारणीभूत आहेत. बनावट नोटा तपासण्याची यंत्रे आता भारतात तयार झाली आहेत. पण निरनिराळया बँकातून त्यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा कार्यक्षम नसल्याने देशभर बनावट नोटांचा सुळसुळाट झाला आहे.

यावर नियंत्रण ठेवण्यासाठी दिल्लीच्या पोलीस आयुक्तांनी दिल्लीच्याच पार्लमेंट स्ट्रीटवर ‘येथे तुमच्या तोटा तपासून मिळतील’ अशा आशयाचे आवाहन करणारे कार्यालय उघडले आहे. तेथे खाजगी नोटाही तपासून दिल्या जातात व निरनिराळ्या बॅकात सापडलेल्या बनावट नोटाही जमा केल्या जातात. गेल्या एका महिन्यात तेथे बत्तीस लाख रुपयांच्या नोटा जमा झाल्या आहेत. पोलीसांच्या म्हणण्यानुसार या नोटा प्रामुख्याने बंगालमधील चोवीस परगणा जिल्हा, नेपाळ गोरखपूर, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, झारखंड येथील चलनात प्रथम घुसतात.

भारतातील नोटातील जाणकार श्री अनिल काळे यांच्या म्हणण्यानुसार ही घुसखोरी सीमाभागापेक्षा समुद्रमार्गे अधिक होते. बांगला देशला लागून असलेल्या चोवीस परगणा या जिल्ह्यात बनावट नोटांची दुकानेच आहेत. एक हजारच्या नोटेला ‘बडी चप्पल’ व पाचशेच्या नोटेला ‘छोटी चप्पल’ अशी नावे आहेत. दक्षिणेकडील राज्यात या बनावट नोटा घुसवणे सोपे जाते कारण आपला किनारा मोठा आहे व उत्तरेत चीन व पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेवर जसे कुंपण आहे तसे दक्षिणेला कोठे नाही.

यातील क्वेट्टा, दुबई व बँकाकमधील बनावट नोटांच्या छपाईयंत्रणेपेक्षा काश्मीरमधील बनावट नोटांच्या छपाई यंत्रणेची देशातील पोलीस यंत्रणेने अधिक गंभीर दखल घेतली आहे कारण गेल्या ६५ वर्षात भारताचे शत्रूत्व करणे येवढ्याच कार्यक्रम पत्रिकेवर जगलेल्या पाकिस्तान या शेजारी राष्ट्राने भारतातही खोट्या नोटांची छपाई चालू शकते’ दाखवण्यासाठी ते केंद्र सुरु ठेवले आहे. त्यातील नोटांची बरीचशी छपाई क्वेट्टा येथेच केली जाते व काही मार्क हे काश्मीरमधील फिरत्या छपाई यंत्रणेत तयार केले जातात. यावर संसदेत अनेक वेळा चर्चा होते पण प्रत्यक्षात बनावट नोटांची चोरटी आयात कमी होण्यात त्याचे रुपांतर झालेले नाही. सरकारी यंत्रणेइतकेच नागरिकांचे दुर्लक्ष हे त्याचे कारण आहे; असे जाणकारांचे म्हणणे आहे.