पुणे: भारतीय चित्रपटसृष्टीच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्यासाठी फिल्म अँड टेलिव्हीजन इंन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) वतीने ‘राष्ट्रीय विद्यार्थी चित्रपट महोत्सव अणि विद्यार्थी पुरस्काराचे आयोजन केले आहे. हा महोत्सव १९ ते २४ एप्रिल या कालावधीत होणार असल्याची माहिती एफटीआयआयचे संचालक डी.जे. नारायण यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
गोव्यात होणारा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (इफ्फी) आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या धर्तीवर विद्यार्थी चित्रपट महोत्सव आणि चित्रपट पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले आहे. एफटीआयआय, पुणे, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसेच सत्यजीत राय फिल्म अँड टेलिव्हिजन इंन्स्टिट्यूट, कोलकाता यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा दिवस चालणार्या या महोत्सवाचे १९ एप्रिलला औपचारिक उद्घाटन होणार असून २४ एप्रिलला पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे.
या महोत्सवामध्ये देशभरातील विद्यार्थ्यांनी बनविलेले निवडक चित्रपट पाहता येणार आहेत. तसेच यामधील चित्रपटांना फिक्शन,नॉन फिक्शन, अॅनिमेशन, उत्कृष्ट दिग्दर्शन, चित्रपट, नृत्य, कला दिग्दर्शन, संवाद आदी वेगवेगळ्या विभागात पुरस्कार देण्यात येणार आहेत.
आतापर्यंत देशभरातून या महोत्सवासाठी एकूण १५० संस्थांनी सहभाग नोंदविला आहे. चित्रपट विद्यार्थ्यांनी तयार केलेले असले तरी त्याला संबंधित संस्थेची अधिकृत परवानगी असल्याशिवाय महोत्सवात सहभागी करून घेण्यात येणार नाही; असे नारायण यांनी सांगितले.