इस्लामाबाद: अमेरिकन सैन्याने ज्याप्रमाणे अफगाणिस्तानातून माघार घ्यायला सुरुवात केली आहे; त्याचप्रकारे भारतीय लष्करावरही काश्मिरातून परतण्याची लाजीरवाणी वेळ येईल; असे मुंबई हल्ल्याचा प्रमुख सुत्रधार जमात-उद-दवा संघटनेचा म्होरक्या हाफिज सईदने म्हटले आहे. या सर्व पोस्टस त्याने ट्वीटरवर पोस्ट केल्या आहेत.
सईदने पुढे असेही म्हटले आहे की; भारत सध्या पाकिस्तानविरुद्ध युद्धाच्या तयारीत असून लवकरच ते पाकवर मोठा हल्ला करणार आहेत. भारत शस्त्रास्त्र संख्येत मोठी वाढ करीत आहे. अफगाणिस्तान आणि बलुचिस्तानमध्ये अमेरिकेच्या पराभवानंतर भारताचा खेळ संपला आहे. अफगाणिस्तानातून अमेरिका गाशा गुंडाळत आहे, तर जगाला काश्मिरातून भारताची माघार बघायला मिळेल.
संसदेवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड अफझल गुरुच्या फाशीनंतर काश्मिरमधील फुटीरवादी नेता यासिन मलिक आणि हाफिज सईद एकाच व्यासपीठावर आले होते. काश्मिरात फुटीरवादी नेत्यांना भडकाविण्याचे काम सईद करीत असून भारतात मोठ्या दहशतवादी कारवाया करण्याची धमकीही सईदने दिली होती.