मुंबई मध्ये दीडशे किमी मेट्रो रेल्वेचे जाळे उभारणार

मुंबई: मुंबई तसेच लगतच्या प्रदेशात १५० किमीचे मेट्रो रेल्वेचे जाळे तयार करण्याचे महत्वाकांक्षी नियोजन मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाने तयार केले असून लंडनमधील जगप्रसिध्द अशा ट्रान्सपोर्ट फॉर लंडन या मेट्रो रेल चालविणार्‍या अनुभवी कंपनीसमवेत आज या संदर्भातील सामंजस्य करारावर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच ब्रिटनच्या उच्चस्तरीय व्यापारी शिष्टमंडळातील प्रतिनिधी उपस्थित होते. ब्रिटनच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व तेथील मंत्री श्री. ग्रेगरी बार्कर यांनी केले.

सोमवारी ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हीड कॅमरॉन मुंबईत असून त्यांच्या समवेत हे शिष्टमंडळ देखील आले आहे. एमएमआरडीए आयुक्त राहुल अस्थाना आणि ट्रान्सपोर्ट फॉर लंडनच्या कॅपिटल प्रोग्रामचे डायरेक्टर डेव्हीड वॅबोसो यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षर्‍या केल्या. या सामंजस्य करारामुळे मुंबई तसेच सभोवतालच्या परिसरात १५० किमीचे मेट्रोचे जाळे उभारण्यास मदत होईल.

एमएमआरडीएने शहरामध्ये मेट्रो रेल्वे जाळ्याचा आराखडा तयार केला आहे. या व्यतिरिक्त एका सर्वंकष अशा परिवहन अभ्यासगटाने मुंबईमध्ये ३०० किमीचे मेट्रो रेल नेटवर्क असावे अशी सूचना केली आहे. या महत्वकांक्षी प्रकल्पातंर्गत १४६ किमी लांबीचे ९ लाईन्सचे मेट्रो नेटवर्क उभारण्यात येईल. यात ३ मार्गांचे ३३ किमीचे नेटवर्क हे भूमिगत असेल. भूमिगत मेट्रो उभारणीचा अनुभव एमएमआरडीएला नाही मात्र ट्रान्सपोर्ट फॉर लंडन कंपनीला भूमिगत रेल्वे चालविणे व व्यवस्थापनाचा १५० वर्षांचा अनुभव आहे.त्यामुळे मुंबईतील रेल्वे वाहतूकीत अमूलाग्र आणि अत्याधुनिक बदल होतील.

Leave a Comment