महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश करा: मायावतींचा नारा

नागपूर: आमचा बहुजन समाज पक्ष कोणत्याही जाती-पातींचा विचार करत नाही. खर्‍या अर्थाने आमचा पक्ष लोकशाहीवादी असल्याने आगामी निवडणुकीत माझ्या पक्षाला मतदान करुन महाराष्ट्राचा उत्तरप्रदेश करायला हातभार लावा, असा नारा बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी येथे दिला आहे.

बसपाच्या राज्यस्तरीय कार्यकर्ता अधिवेशनाच्या निमित्ताने मायावतींनी महाराष्ट्रात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महाराष्ट्रात सत्ता आली तर मी कोणत्याही जातीचे राजकारण करणार नाही. दलित आणि शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय, दलितांसाठी लढलेल्या नेत्यांची भव्य स्मारके बांधली जातील, असे त्यांनी सांगितले.

आपण संसदेत आवाज उठवल्यानंतरच सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा दिली; असा दावा करीत केंद्र आणि राज्यातील काँग्रेस सरकार तसेच भाजपवर जोरदार टीका करताना मायावती यांनी आगामी लोकसभा निवडणूकीतील आपला जाहीरनामा भाषणात वाचला.

बसपाला मते दिल्यास वेगळ्या विदर्भाला त्वरित मंजुरी दिली जाईल. तेलंगणाप्रमाणे वेगळ्या विदर्भाचाही विचार केला पाहिजे; असे ठासून सांगताना मायावती म्हणाल्या की; उत्तर प्रदेशची विकासाची गंगा महाराष्ट्रात आणण्यास आपण कटिबद्ध आहोत.

Leave a Comment