डॉक्टरांच्या हलगर्जीपणानेच सविताचा मृत्यू

लंडन: गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात भारतीय दंतचिकित्सक सविता हल्लपनवार हिचा गर्भार अवस्थेत झालेला मृत्यू हा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच घडल्याचे उघड झाले आहे. यासंदर्भात तपासी अधिकार्‍यांनी तयार केलेला अहवाल फुटल्याने ही बाब उघड झाली आहे. सविताच्या कुटुंबियांच्या मते निदान सविताचे प्राण वाचवता आले असते; हा दावाही यामुळे खरा ठरला आहे.

आर्यलंडच्या आरोग्य मंत्रालयाच्या एका पथकाने तयार केलेल्या अहवालानुसार ३१ वर्षीय सविताला नक्की काय झाले आहे याचे निदान करण्यात; त्यावर उपचार करण्यात आणि वाढत असलेला जंतूंचा प्रादुर्भाव रोखण्यात तिच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांना अपयश आले. परिणामत: ती मृत्युच्या दाढेत ढकलली गेली.

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात १७ आठवड्यांची गर्भवती असलेल्या सविताला गाल्वे युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये पाठदुखीच्या कारणास्तव दाखल करण्यात आले होते. यावेळी वैद्यकीय तपासणी केली असता तिचा गर्भ स्थानभ्रष्ट असल्याचे लक्षात आले होते. त्यासाठी गर्भपात करणे आवश्यक होते. मात्र आर्यलंडमध्ये गर्भपाताला कायदेशीर मान्यता नसल्याने डॉक्टरांनी गर्भपात करण्यास नकार दिला होता.
त्यानंतर, सविताची प्रकृती गंभीर बनली आणि तिच्या शरिरात विजातीय जंतूंचा प्रादुर्भाव वाढला. यावर उपचार करणे डॉक्टरांना जमले नाही.

अशातच २८ ऑक्टोबर रोजी सविताची प्राणज्योत मालवली. त्यानंतर जगभर गर्भपाताच्या कायद्यांविषयी विचारमंथन झाले होते. सध्या आपण यावर काही बोलणार नसल्याचे सविताचे पती प्रवीण यांनी म्हटले आहे.

Leave a Comment