एफडीआय आकर्षित करण्यात महाराष्ट्र आघाडीवर

नवी दिल्ली: थेट परकीय गुंतवणूकीमुळे अर्थात एफडीआयवरून वादंग असला तरी गेल्या १२ वर्षामध्ये एकूण एफडीआयपैकी निम्म्याहून अधिक गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र व राष्ट्रीय राजधानी प्रदेशाने (नॅशनल कॅपिटल रिजन) यश मिळविले आहे. एप्रील २००० पासून सुमारे १८६.८२ अब्ज अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक देशात करण्यात आली आहे.

त्यापैकी सर्वाधिक म्हणजे ६१.२३ अब्ज अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. एप्रील २००० ते नोव्हेंबर २०१२ या १२ वर्षाच्या काळातील एकूण गुंतवणुकीपैकी ही ३३ टक्के गुंतवणूक आहे; असे उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीत स्पष्ट झाले आहे. यानंतर दिल्लीसह उत्तर प्रदेश, हरियानाचा समावेश होणार्‍या नॅशनल कॅपिटल रिजनचा समावेश होतो. या प्रदेशाने या काळात सुमारे ३५.६६ अब्ज अमेरिकी डॉलर्सची गुंतणूक खेचण्यात यश मिळविले. एकूण गुंतवणूकीपैकी ही १९ टक्के गुंतवणूक आहे. महाराष्ट्र व एनसीआरमधील आधुनिक आणि विकसित पायाभूत सुविधामुळे जास्तीत जास्त एफडीआय या प्रदेशांमध्ये झाली आहे, असे एका अधिकार्‍याने सांगितले. देशांचा विचार करता सर्वाधिक गुंतवणूक मॉरिशसने केली असून त्यानंतर सिंगापूरचा क्रमांक लागतो.

सेवा क्षेत्रे, दूरसंचार, खनिजसंपत्तीविषयक उद्योग, ऊर्जा, कॉम्प्युटर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर आदीमध्ये मुख्यत: ही गुंतवणूक झाली आहे. दरम्यान, सर्व प्रमुख देशांनी भारतात गुंतवणूक करावी यासाठी सरकार एफडीआय धोरण अधिक आकर्षक आणि गुंतवणूकीस योग्य करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मल्टी ब्रँड रिटेल, ऊर्जा देवाणघेवाण, प्रसारण या क्षेत्रांमधील एफडीआय धोरणामध्ये बंधने काढून उदारीकरणाचे धोरण सरकारने स्वीकारले आहे.

एफडीआय अब्ज अमेरिकी डॉलर्समध्ये- कर्नाटक १०.४३, तामिळनाडू ९.७२, गुजरात ८.५३, आंध्र प्रदेश ७.५८, प.बंगाल २.१४

देश गुंतवणूक अब्ज अमेरिकी डॉलर्समध्ये- मॉरिशस ७१.३७, सिंगापूर १८.६६, ब्रिटन १७.००, जपान १३.८३, अमेरिका १०.९४

Leave a Comment