कोल्हापुरात गुन्हेगारांना राजाश्रय: चंद्रकांत पाटील

कोल्हापूर: समाजातील गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यापेक्षा स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी गुन्हेगारांनाच राजकीय आश्रय देणार्‍या राज्यकर्त्यांमुळे समाजातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याचा आरोप करून आपल्या कार्यकर्त्यांना मटका अड्डे सुरू करून देणारे गृह राज्यमंत्री नागरिकांचे संरक्षण काय करणार; असा सवाल भारतीय जनता पक्षाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला.

मुळात शांत असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षापासून गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून मुंबई, पुण्यासारख्या शहरात दिसणार्‍या गोळीबारासारख्या घटनांचे प्रमाण कोल्हापूर जिल्ह्यातही आता वाढू लागले आहे. चंदगडमधील बांदिवडेकर खून खटल्यानंतर बेलवडे आणि आता कोल्हापुरात झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणामुळे कोल्हापूर किती अशांत आहे, हे दाखवून दिल्याचे सांगून या सर्व प्रकाराला स्वार्थी राजकारणच कारणीभूत असल्याचा आरोपही पाटील यांनी केला आहे.

निवडणुकीच्या कालावधीमध्ये आपल्या विरोधकांना धमकावण्यासाठी गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरणे, समाजात दहशत माजवण्यासाठी त्यांचा वापर करणे आणि निवडणुकांनंतर या गुंड प्रवृत्तीच्या लोकांसाठी विविध ठिकाणी अवैध व्यवसाय सुरू करून देण्याचे काम अनेक राज्यकर्त्यांनी केल्यानेच समाजातील कायद्याची भीती कमी होत चालली आहे. कोणताही गुन्हा घडला की, गुन्हा करणार्‍यांना पाठीशी घालणार्‍या या राजकारण्यांची पोलीस ठाण्यात होणारी गर्दी, त्यांच्या जामिनासाठी त्यांना तुरुंगातून सोडवण्यासाठी होत असलेल्या काही राज्यकर्त्यांच्या प्रयत्नामुळेच गुंड प्रवृत्तीच्या तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याचे ठाम मतही पाटील यांनी व्यक्त केले.

Leave a Comment