रत्नागिरी गॅसमध्ये वीज निर्मिती सुरू

मुंबई: दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर वीजटंचाईचे संकट राज्यासमोर उभे ठाकले असताना, आता गुहागर येथील रत्नागिरी गॅस प्रकल्पातून वीजनिर्मिती सुरू झाली आहे. ही माहिती कंपनीच्या सूत्रांनी मुंबईत दिल्याने विजेची समस्या थोडीतरी सुटल्याचे मानले जात आहे.

आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस प्रकल्पात गुरुवारपासून पुन्हा एकदा वीजनिर्मिती सुरू झाली. प्रकल्पाच्या तीन बी या युनिटमधून निर्माण होणारी वीज ही २५० मेगावॉट एवढीच असली तरी भविष्यात उपलब्ध होणारा गॅस व त्याच्या वाढत्या किमतीचा तिढा सुटल्यास प्रकल्पाच्या तीन टप्प्यांमधून सुमारे १९६० मेगावॉट वीजनिर्मिती होईल. हा प्रकल्प पूर्णक्षमतेने सुरू झाल्यास उन्हाळ्यात राज्यातील जनतेला भारनियमनापासून दिलासा मिळेल.

रिलायन्सच्या गुजरात प्रकल्पातून होणार्‍या गॅसच्या अपुर्‍या पुरवठ्यामुळे ही वीजनिर्मिती बंद झाली होती; परंतु त्यानंतर रिलायन्स व आरजीपीपीएल व्यवस्थापन यांच्यामध्ये चर्चा होऊन बंद झालेला गॅसपुरवठा पुन्हा पूर्ववत करण्यात आला. गुरुवारी सकाळी साडेसात वाजता प्रकल्पाचे तीन बी हे युनिट सुरू करण्यात आले.

अंजनवेल येथील आरजीपीपीएलच्या एलएनजी टर्मिनलमध्ये आखाती देशांमधून जहाजाद्वारे आणलेल्या लिक्विड गॅसचे हवेतील गॅसमध्ये रूपांतर करण्यात आले. हा रूपांतर केलेला गॅस नव्याने टाकण्यात आलेल्या अंजनवेल-कोल्हापूर-बंगळूरू-गोवा या पाइपलाइनद्वारे पाठवण्यात आला होता.

Leave a Comment