मध्य रशियामध्ये उल्कापातात चारशे जण जखमी

मॉस्को: मध्य रशियाच्या उरल पर्वतरांगेमध्ये वसलेल्या चिलियाबिन्स्क प्रांतात झालेल्या एका उल्कापातामध्ये किमान ४०० लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. शुक्रवारी सकाळी अचानक प्रकाशाचा एक अत्यंत तेजस्वी लोळ पर्वतरांगेच्या दिशेने येताना दिसल्याने अनेक नागरिक उत्सुकतेने घराबाहेर पडले. या प्रकाशाच्या उगमस्थानाचा वेध घेत असतानाच अचानक प्रचंड मोठा स्फोटाचा आवाज झाला. कानठळ्या बसवणार्‍या या स्फोटांमुळे अनेक इमारतींच्या काचा तडकून फुटल्या आणि नागरिक जखमी झाले, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.

या अचानक झालेल्या दुर्घटनेमुळे या परिसरात अफवांचेही पीक आले. काहींच्या मते एकाचवेळी अनेक उल्का कोसळल्या तर काही जणांनी हा एकाच उल्केचा पतन असल्याचे सांगितले.

संपूर्ण परिसरात या उल्कापातामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेण्याचे काम सुरू झाले असून आपत्ती व्यवस्थापनाची पथके येथे दाखल झाली आहेत. एका ठिकाणी तर एका इमारतीवर असलेले ६०० चौरस मीटर्सचे शीशाचे छप्पर भुईसपाट झाले आहे.

खगोलतज्ज्ञांच्या मते कोसळलेली उल्का ही २०१२ डीए १४ या नावाची असावी. त्यविषयीचा अधिक तपशीलही गोळा करण्यात येत आहे.

Leave a Comment