नक्कल करायला अक्कल लागते- राज ठाकरे

खेड (रत्नागिरी) – नक्कल करायलाही अक्कल असावी लागते, त्यामुळे अक्कल नसणारे, नक्कल करू शकत नाहीत, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजित पवार यांना लगावला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा राज्यव्यापी दौरा सुरू आहे. या दौर्‍यातील दुसरी सभा रत्नागिरीतील खेड येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी मनसेमध्ये प्रवेश केला. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाच्या सुरूवातीलाच अजित पवार यांच्यावर हल्ला चढवला.

यावेळी ते म्हणाले, नकला करून जनतेचे प्रश्न सुटत नाहीत, त्यामुळे नौटंकी बंद करा, असे अजित पवार म्हणाले होते. त्यावर राज यांनी नक्कल करायलाही अक्कल लागते असे प्रत्युत्तर दिले. यानंतर मग लगेचच राज ठाकरे यांनी कोकणातील स्थानिक मुद्द्यांना हात घातला. कोकणातील उद्योग, परप्रांतियांची घुसखोरी, जैतापूर आदी विषय राज यांनी हाताळले.

कोकणातील- मालवणमध्ये नारायण राणेंनी जमिनी लाटल्या की नाहीत, असा सवाल राज ठाकरे यांनी केला. तसेच मालवणमध्ये राणेंची दहशत आहे. कोकणी माणूस राणेंच्या दहशतीखाली आहे, हे दिसतेय. जर तसे नसेल, तर राणेंनी याबाबत खुलासा करावा, असेही राज ठाकरे म्हणाले.
कोकणवासियांनी आपल्या जमिनी अजिबात विकू नये. कारण जमीन गेली, की अस्तित्व जाईल, असे राज ठाकरे म्हणाले. कोकणात पर्यटन सोडून अन्य उद्योगांसाठी जमिनी विकू नका, तसेच येथे येणार्‍या उद्योगांमध्ये तुमची भागीदारी करा, आणि स्वत: उद्योजक, व्यावसायिक व्हा, असा सल्लाही राज ठाकरे यांनी दिला.

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला राज ठाकरेंनी अप्रत्यक्ष पाठिंबा दिला. अणुऊर्जा प्रकल्प जर वाईट असेल तर खड्ड्यात घाला, पण चांगला असेल तर राजकारण नको, असं राज म्हणाले. देशभरात बांगलादेशी घुसखोरी करत आहेत. कोकणालाही त्याची लागण झाली आहे. येथे बांगलादेशी घुसखोरी करून, कोकणाची वाट लावत आहेत, असे राज ठाकरे म्हणाले. याशिवाय कोकण रेल्वेने कोकणचा काय विकास केला, असा सवाल करत राज यांनी या रेल्वेतून घुसखोरी वाढल्याचे नमूद केले.
बांगलादेशी घुसखोरांकडून देशात बनावट नोटा पसरवल्या जात आहेत. हे घुसखोर बंगाली बोलून त्यांचा व्यवसाय वाढवतायत. अशा घुसखोरांना वेळीच रोखले पाहिजे.याशिवाय एकदा सत्ता देऊन दाखवा,राज्य कसं करायचे अन् कसे हाकायचे दाखवतो, असे राज म्हणाले.

तसेच पॉवरप्लांटच्या मुद्द्यावर येताच त्यांनी जैतापूर प्रकल्पाला हात घातला. या जैतापूर प्रकल्पातून नुकसान होणार असेल तर याला विरोध करा. पण कोणी या मागून आपले राजकारण करू पाहात असेल तर तसे राजकारण करणा-याला धुडकावून लावा, असे म्हणत राज ठाकरे यांनी शिवसेनेवर हल्ला केला. या जैतापूर प्रकल्पामागे राजकाण्यांचे मोठे लॉबिंग सुरू आहे. ते राजकारण करतात आणि तुम्हाला झुंजवत ठेवतात, असेही राज ठाकरे म्हणाले. मुंबईच्या मध्यभागात चेंबूर येथे भाभा अटोमिक रिसर्च सेंटर आहे. त्याची कोणाला अडचण नाही. तिथे भूकंप झाला तर किती लोकं मरतील. पण तरी हा प्रकल्प अगदी सुरळीत सुरू आहे, मग इथे काय अडचण आहे. त्सुनामी काय कोकण आहे असे ठरवून येणार आहे का? असा सवाल करत शिवसेनेला चिमटा देखिल घेतला.

Leave a Comment