अमेरिकन संसदेत खासदारांनी गाईले मोदी स्तुतीगान

वॉशिंग्टन: गेल्या वर्षी अमेरिकेत प्रवेशासाठी व्हिसा मिळण्यात अडचण आलेल्या गुजरताचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा वारू अमेरिकेतही सुसाट निघाल्याचे दिसते आहे. अमेरिकन संसदेत खासदार एच. एच. फालेओमावेगा यांनी नरेंद्र मोदींची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे.

नुकतीच युरोपियन युनियनने मोदींवरील बहिष्कार मागे घेतल्यानंतर मोदींनी गुजरातसाठी अनेक नव्या योजनांचे करार केले आहेत. काही नव्या योजना युरोपातील विविध देशांच्या माध्यमांतून गुजरातमध्ये साकारणार आहेत.

आता अमेरिकेतही मोदींविषयी प्रचंड आकर्षण असल्याचे दिसून आले आहे. मोदींची दूरदृष्टी आणि विचारांचे समर्थन करायला हवे; असे फालेओमावेगा यांनी अमेरिकेच्या सरकारला सांगितले आहे. फालेओमावेगा हे आशिया, जागतिक पर्यावरण विषयक उपसमितीचे सदस्य आहेत. मोदींच्या समर्थनार्थ उघडपणे समोर येणारे ते पहिलेच खासदार आहेत.

मोदींच्या नेतृत्त्वगुणांमुळेच त्यांचे राज्य आज भारतातील एक मोठी आर्थिक सत्ता आहे. मोदींच्या यशानंतर अमेरिका गुजरातकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल अशी आशा आहे. देशात तसेच परदेशातही रोजगार निर्मितीसाठी मोदींचे कार्य महत्त्वाचे आहे. अर्थव्यवस्था सुधारण्याच्या दृष्टीनेही मोदींचे कार्य उल्लेखनीय आहे. त्यामुळे आता मोदींबद्दल अमेरिकेचे विचार बदलायला हवेत, असे फालेओमावेगा यांनी म्हटले आहे.

Leave a Comment