जैतापूर प्रकल्प वेगाने पूर्ण करू: पंतप्रधानांची ग्वाही

नवी दिल्ली: स्थानिक नागरिक, पर्यावरणवादी स्वयंसेवी संस्था अशा विविध घटकांतून विरोध होत असला तरी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापूर-माडबनचा आण्विक वीज प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यात येणार असल्याची ग्वाही भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रॅन्कॉईस होलान्डे यांना दिली आहे.

फ्रेंच कंपनीने उत्पादित केलेल्या सहा अणुभट्ट्या वापरून जैतापूर येथे ९ हजार ९९० मेगावॅट क्षमतेचा देशातील सर्वांत मोठा अणुवीज प्रकल्प लवकर पूर्ण करण्यात यावयाचा आहे.

भारत भेटीवर आलेले होलान्डे यांच्याशी द्विपक्षीय स्वारस्याच्या विविध विषयांवर वाटाघाटी केल्यानंतर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग म्हणाले की; आम्ही जैतापूर प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला आहे. तो लवकर पूर्ण करण्याच्या कटिबद्धतेचाही पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.

जैतापूर प्रकल्पासाठी फ्रान्सची अरेव्हा कंपनी अणुभट्ट्या पुरविणार आहे. त्यासाठीचा ९.३ अब्ज डॉलरचा प्राथमिक करार फ्रान्सचे याआधीचे राष्ट्राध्यक्ष निकोलस सार्कोझी यांच्या २०१० मधील भारत भेटीच्या वेळी झाला होता.

मात्र जपानचा फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्प दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर जैतापूर प्रकल्पाच्या विरोधात स्थानिकांसह पर्यावरणवाद्यांनी दंड थोपटले आहेत. कालंच नवी दिल्ली आणि तमिळनाडूतील कुडनकुलम येथे फ्रान्सच्या अध्यक्षांच्या निषेधार्थ मोर्चाचे आयोजनही करण्यात आले होते.

Leave a Comment