कोल्हापुरात भर दिवसा खूनः हल्लेखोर गृहराज्यमंत्र्यांचे समर्थक असल्याचा आरोप

कोल्हापूर – कोल्हापुरातील माजी सरपंचाची हत्या, गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या समर्थकांनी केल्याचा दावा त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. माजी सरपंच अशोक पाटील यांची बुधवारी हत्या करण्यात आली होती. हत्येप्रकरणी दिलीप जाधवसह आणखी तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

या प्रकरणी गुन्हा दाखल करताना सतेज पाटील यांनाही आरोपी करा अशी मागणी कुटुंबियांनी केली होती. पण पोलिसांनी नकार दिल्याने पोलिस ठाण्यासमोर नागरिकांनी घोषणाबाजी केली होती. शहरात काल झालेल्या काल या हत्येमुळे रात्रभर तणावाचे वातावरण होते.

दरम्यान कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी अशोक पाटील यांच्या कुटुंबियांची समजूत काढली आणि मध्यरात्री अडीचच्या सुमारास त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला.

कोल्हापूरजवळील पाचगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि आमदार महादेवराव महाडिक यांचे कट्टर समर्थक अशोक पाटील यांच्यावर भरदिवसा अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या गोळीबारात ते जागीच ठार झाले. भरदिवसा झालेल्या या प्रकाराने कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कोल्हापुरात राज्य पोलिसांचे की गुंडांचे असा प्रश्‍न नागरिक उपस्थित करत आहेत.

कोल्हापुरातील न्यू महाद्वार रोडवरील खरी कॉर्नर हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. दुपारी दीड ते पावणेदोनच्या सुमारास याच परिसरात असणार्‍या अ‍ॅक्सेस बँकेसमोर पाचगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अशोक पाटील (वय ४०, रा. पाचगाव, ता. करवीर) हे बँकेत आले होते. याच वेळी दोन दुचाकीवरून ४ अज्ञात तरुण त्या ठिकाणी आले. काही क्षणातच या तरुणांनी अशोक पाटील यांच्यावर गोळीबार केला. त्याच्या डोक्यात १ आणि मानेवर २ अशा ३ गोळ्या मारण्यात आल्या. या गोळीबारात पाटील रक्ताच्या थारोळ्यात पडले. स्थानिक नागरिकांनी त्यांना सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, उपचारापूर्वीच ते मृत झाल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळी पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव यांनी तत्काळ भेट दिली.

घटनास्थळी पोलिसांना ३ पुंगळ्या मिळून आल्या आहेत. शहरात संपूर्ण नाकेबंदी करण्यात आली आहे. तपासासाठी पोलिसांनी ५ पथके पाठवलेली असल्याचे करवीरचे उपविभागीय अधिकारी जयवंत देशमुख यांनी पत्रकारांना सांगितले.

अशोक पाटील यांच्यावर गोळीबार झाल्याचे वृत्त कळताच धनंजय महाडिक समर्थकांनी सीपीआर परिसरात मोठी गर्दी केली. पाचगाव ग्रामपंचायत हा कोल्हापूर जिल्ह्यातील अतिसंवेदनशील भाग मानला जातो. राजकीय वैमनस्यातून त्यांच्यावर गोळीबार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. अशोक पाटलांच्यावर गोळीबार झाल्याने पाचगावात तणाव निर्माण झाला आहे. त्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून अधिक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास जुना राजवाडा पोलीस करत आहेत.

Leave a Comment