नवी दिल्ली: फजल गुरूला फाशी देण्याबद्दल त्याच्या कुटुंबियांना वेळीच माहिती न दिल्यामुळे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कानउघाडणी केली आहे. या मुद्द्यावरून सरकारला विविध संघटना आणि राजकीय पक्षांच्या टीकेला तोंड द्यावे लागत आहे.
गुरूला फाशी देण्याबाबत पाळण्यात आलेली गुप्तता आणि सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा गुरूचा हक्क डावलला गेल्यामुळे डाव्या पक्षांनी बुधवारी सरकारला धारेवर धरले. या प्रकाराबद्दल पंतप्रधानांनी राष्ट्रपती भवनात राज्यपालांच्या संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधानांनी शिंदे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. शनिवारी गुरूला फाशी देण्यापूर्वी त्याच्या कुटुंबियांना माहिती देणे आवश्यकंच होते; असे सिंग यांनी सुनावले.
दहशतवाद्यांच्या विरोधात कठोर भूमिका आवश्यक असली तरीही गुरूच्या फाशीबद्दल त्याच्या कुटुंबियांना कळविण्यात ज्या पद्धतीची बेपर्वाई दिसून आली; त्या पद्धतीने राज्यकारभार करता येत नाही; असेही पंतप्रधान शिंदे यांना म्हणाले. गुरूच्या काश्मीरमधील कुटुंबियांना फाशीबद्दल शुक्रवारी स्पीड पोस्टने पत्र पाठविण्यात आले. ते प्रत्यक्षात फाशी दिल्यावर ५१ तासांनी पोहोचले.