वाजपेयी पंतप्रधान असते तर अफजलला फाशी झाली नसती

नवी दिल्ली: सध्या भारताच्या पंतप्रधानपदी अटलबिहारी वाजपेयी असते तर संसदेवरील हल्ल्यातील सूत्रधार अफजल गुरू याला फाशी झाली नसती; असे रॉ या गुप्तहेर संघटनेचे माजी प्रमुख आणि काश्मीर मुद्यावरील विशेषज्ञ ए. एस. दौलत यांनी म्हटले आहे.

दौलत हे १९९९ ते २००० या काळात रॉचे अध्यक्ष होते. तसेच ते काश्मीर मुद्यावर वाजपेयींचे सल्लागारही होते. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत दौलत म्हणाले, की भारतीय जनता पक्ष (भाजप) अफजलच्या फाशीबद्दल अनेक दिवसांपासून मागणी करत होता. पण, वाजपेयी पंतप्रधान असते तर त्यांनी हे पाऊल कधीच उचलले नसते. अफजलला दिलेली फाशीची वेळ ही अयोग्य आहे. त्यामुळे काश्मीर खोर्‍यात अशांतता पसरण्याची शक्यता आहे. काश्मीरमध्ये पुन्हा पहिल्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते; अशी भीतीही दौलत यांनी व्यक्त केली.

अफजलच्या फाशीने ओमर अब्दुल्ला यांचे सर्वाधिक नुकसान होणार असल्याचे सांगत दौलत म्हणाले, की काश्मीर खोर्‍यात त्यांनी आपली विश्वासहर्ता गमाविली आहे. काश्मीर खोर्‍यात सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकारने पाऊले उचलली पाहिजेत. अन्यथा काश्मिर खोर्‍यातील परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे.