रिक्त पदे भरण्यासाठी मुहूर्त लागतो काय; न्यायालयाचा सवाल

मुंबई- राज्यातील पोलिसांची मंजूर असलेली रिक्त पदे भरण्यासाठी मुहूर्त शोधता आहात काय? असा सवाल उपस्थित करून उच्च न्यायालयाने आज राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले.

गेल्या दोन महिन्यात ही रिक्त पदे भरण्यासाठी ठोस पावले न उचलता ती पदे एप्रिल, मे महिन्यानंतर ऑनलाइन भरली जाणार असल्याची माहिती सरकारी वकील अ‍ॅड. प्राजक्ता शिंदे यांनी न्यायालयाला सांगताच न्यायमूर्ती अजय खानविलकर आणि न्यायमूर्ती के. के. तातेड यांच्या खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. ही पदे भरण्यासाठी मुहूर्त शोधता काय? याच महिन्यात मुहूर्त आहेत काय? असे खडसावत 18 फेबु्रवारपर्यंत या पदांच्या भरतीसंदर्भात माहिती द्या, असे राज्य सरकारला बजावले.

तीन वर्षापूर्वी पुण्यातील गाजलेल्या निखिल राणे खून प्रकरण तपास करण्यास पोलिसांना अपयश आल्याने राणे यांच्या पत्नी अश्‍विनी राणे यांनी दाखल केलेल्या याचिकेची आज न्यायमूर्ती अजय खानविलकर आणि न्यायमूर्ती के. के. तातेड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. दोन महिन्यापूर्वी झालेल्या सुनावणीच्या वेळी सरकारी वकील अ‍ॅड. प्राजक्ता शिंदे यांनी दीड वर्षापूर्वी पोलीस खात्यात दोन लाख ७ हजार ८८४ पदे मंजूर करण्यात आली. त्यापैकी २६ हजार रिक्त पदे होती. त्यापैकी १४ हजार पदे भरल्यानंतर १२ हजार ७८६ पदे रिक्त असल्याची माहिती दिली होती. त्यावेळी ही पदे केव्हा भरणार, असा सवाल उच्च न्यायालयाने केला होता.

गेल्या दोन महिन्यात या रिक्त पदांसंदर्भात सरकारने कोणतेही पाऊल उचलले नाही. उलट ही पदे भरण्यासाठी मे महिना उजाडेल, असे सांगण्यात आल्याने न्यायालयाने संताप व्यक्त केला.

Leave a Comment