भन्नाट अदाकारीची ‘एबीसीडी’

नृत्य दिग्दर्शक रेमो डिसूझा ‘फालतू’नंतर पुन्हा एकदा अपल्याला दिग्दर्शकाच्या रूपात भेटायला आला आहे. खास प्रभूदेवाला सोबत घेऊन ‘एबीसीडी’ म्हणजे ‘एनी बडी कॅन डान्स’ हा चित्रपट घेऊन! या चित्रपटाचे वैशिष्ट्ये म्हणजे अर्थातच भन्नाट नृत्यप्रकार! हा चित्रपट थ्री डी असल्यामुळे तर हे अचाट नृत्यप्रकार जास्त चित्ताकर्षक ठरतात. यामुळेच हा चित्रपट नजरबंदी करून ठेवतो.
सबकुछ डान्स असलेल्या ‘एबीसीडी’च्या प्रेमात डान्सर्स पडले नसते तरचं नवल.

‘एबीसीडी’ ही कथा आहे डान्स पॅशन असणार्‍या विष्णूची ( प्रभुदेवा). काही मतभेदांमुळे तो जहांगीर खान ( के. के. मेनन) ची डान्स अकादमी सोडतो आणि मग इथूनच सुरु होतो डान्स हेच एकमेव जगण्याचं साधन असलेल्या विष्णूचा खडतर प्रवास! डान्स अकादमी सोडल्यानंतर विष्णू आपला मित्र गोपी ( गणेश अचार्य) कडे जातो. तिथे गणेशोत्सवादरम्यान दोन गटातील डान्स कॉम्पीटशनमधील उत्साह बघितल्यावर त्याला आपला नवा मार्ग दिसतो आणि तो या मुलांना डान्स शिकविण्याचे काम हाती घेतो. मुलांमधल्या अंर्तगत स्पर्धेला तोंड देत विष्णू जहांगीरविरूद्ध सुरू केलेली लढाई कशा प्रकारे जिंकतो हे जाणून घेण्यासाठी ‘एबीसीडी’ चित्रपटगृहातच जाऊन बघायला हवा.

एक डान्सर आपल्या कलेने, अदाकारीने लोकांना प्रभावित करण्याबरोबरंच आपल्या भावना लोकांपर्यंत हावभावाच्या माध्यमातून पोहचविण्याचा प्रयत्न करत असतो. यातील कला आणि समोरच्यावर प्रभाव पाडणे यातील महत्वाचे काय? याच मुद्यावरून विष्णू व जहांगीर यांच्यात वादाची ठिणगी उडालेली आहे. प्रभू देवाच्या वर्गात झोपडपट्टीत राहणारी मुले डान्स शिकतात. एका विद्यार्थ्याचे वडील या डान्स क्लासच्या विरोधात आहेत. मुले ज्या ठिकाणी डान्सचे प्रशिक्षण घेतात त्या ठिकाणी पोलिस कुलुप लावतात. अशा उपकथानकांमुळे प्रेक्षक कथेच्या अधिक जवळ जातो.
‘एबीसीडी’मध्ये काही उत्तम डान्सर्स आपल्याला पडद्यावर दिसतात. चित्रपटाचा फंडा खूपच सरळ आहे. तो म्हणजे एका एका डान्सनंतर दुसरा डान्स. त्यामुळे चित्रपटातील कलाकारांना आपली प्रतिभा दाखवण्याची योग्य संधी मिळते. प्रभू देवा आणि कोरिओग्राफर-दिग्दर्शक रेमोच्या मार्गदर्शनाखाली सर्व तरुणांनी उत्तम काम केले आहे. या चित्रपटातील चेहरे नवे असले; तरी प्रेक्षकांच्या ओळखीचे आहेत. वेगवेगळ्या डान्स रिऍलिटी शोमध्ये या डान्सर्सना आपण पाहिले आहे. त्यांच्यासोबत प्रभुदेवाचा डान्स बघणं प्रेक्षणीय अनुभव आहे.

नृत्यदिग्दर्शकाचा दिग्दर्शक झालेल्या रेमोचे दिग्दर्शन वेगळेपणा जपते; तसेच कथेला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते. प्रभुदेवा आपल्या नृत्यशैलीने प्रेक्षकांना थिरकवतो. मात्र या चित्रपटात डान्सव्यतिरिक्त काही नाही. त्यामुळे काही अपेक्षा घेऊन गेलात तर तुमचा भ्रमनिरास होण्याची शक्यता आहे. प्रत्येकजण डान्स करु शकतो का? या प्रश्‍नाचे उत्तर वेगवेगळे असेल परंतु हा चित्रपट पहाण्यासाठी तुम्ही गेलात तर तुम्हाला जागेवर खिळवून ठेवण्यचे काम ‘एबीसीडी’ निश्‍चित करतो. एकानंतर एक क्रेझी स्टेप्स आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे प्रत्येकजण या ‘एबीसीडी’चा मनमुराद आनंद घेऊ शकतो यात शंका नाही.

चित्रपट – एबीसीडी, निर्माता – सिद्धार्थ रॉय कपूर, दिग्दर्शक – रेमो डिसूझा, संगीत- सचिन, जिगर
कलाकार – प्रभुदेवा, गणेश आचार्य, के. के. मेनन.

Leave a Comment