टंचाईग्रस्त जनतेच्या पाठीशी शासन ठामपणे उभे – मुख्यमंत्री

बीड- टंचाईग्रस्त भागातील जनतेच्या पाठीशी राज्य शासन ठामपणे उभे असून टंचाईवरील उपाययोजनांना कोणत्याही परिस्थितीत पैसा कमी पडणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

बीड जिल्हयातील टंचाई परिस्थितीचा त्यांनी येथील नियोजन भवन येथे आयोजित बैठकीत आढावा घेतला. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर, मदत व पुनर्वसन मंत्री डॉ. पतंगराव कदम, आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी, खा. रजनीताई पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला, विभागीय आयुक्त संजय जयस्वाल यांची उपस्थिती होती.

जिल्हयातील विद्यमान परिस्थितीबाबतचे सादरीकरण आणि त्यासंदर्भातील उपस्थित लोकप्रतिनिधी तसेच अधिकार्‍यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले की, जिल्हयातील आष्टी, पाटोदा, शिरुर, गेवराई, बीड तालुक्याच्या काही भागातील परिस्थिती गंभीर आहे. आष्टीसारख्या भागात लागोपाठ दुसर्‍या वर्षी पाऊस झालेला नाही. या परिस्थितीचा मुकाबला करताना सर्वांनी एकदिलाने आणि समन्वयाने काम करणे गरजचे आहे. टंचाईग्रस्त भागातील जनतेला मदत करताना जेथे आवश्यक आहे तेथे राज्य सरकार तातडीने निकषात बदल करेल.

केंद्राने काही बाबतीत निकषात बदल करणे आवश्यक असून याअनुषंगाने आपला केंद्र सरकारशी सतत संपर्क आहे; असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ठ केले.

प्राप्त परिस्थितीत येत्या १५ जुलैपर्यंत प्रत्येक गाव व शहराला पाणी पुरवठा करण्याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे. गावाशी अथवा शहराशी निगडीत असलेला एक स्त्रोत आटला तर त्यानंतरचा स्त्रोत निश्चित करणे आवश्यक आहे. जेथे पाणी आणण्याचे अंतर वाढत जाणार आहे तेथे ठराविक अंतरानंतर वीज देयकात सवलत देण्याबाबतची मागणी विचाराधीन असून त्यावर निर्णय घेतला जाईल. काही भागातील चारा छावण्यांसाठी चारा व पाणी दूरवरुन आणावे लागणार आहे, अशा भागांसाठी अपवाद म्हणून काही वेगळा निर्णय घेऊन अडचण दूर करण्याचा सरकार निश्चितपणे प्रयत्न करील असे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment