२-जी प्रकरणातील वकिलाला सीबीआयने हटवले

नवी दिल्ली: राजकीय क्षेत्रात वादळ निर्माण करणार्‍या २-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या खटल्याशी संबंधित एका वकिलाला आज केंद्रीय अन्वेषण विभागाने हटवले. ए.के.सिंह असे त्यांचे नाव आहे. सिंह हे सीबीआयच्या वतीने खटल्यात युक्तिवाद करत होते.

या घोटाळ्यातील एक हाय-प्रोफाईल आरोपी असणारे युनिटेकचे व्यवस्थापकीय संचालक संजय चंद्रा आणि सिंह यांच्यातील कथित संभाषणाची ऑडिओ टेप आज एका वृत्तवाहिनीने प्रसारित केली. या टेपमध्ये सीबीआयच्या रणनीतीवर चर्चा होत असल्याचे ऐकू येते. हे संभाषण प्रसारित झाल्यानंतर सीबीआयने सिंह यांना हटवले.

दरम्यान; युनिटेकने या संभाषणासंबंधीचे वृत्त फेटाळले आहे. चंद्रा यांची संबंधित वकिलाशी कधीच भेट झालेली नाही किंवा दूरध्वनीवरून चर्चाही झाली नसल्याचे युनिटेकने म्हटले आहे.