कारागृहात दूरध्वनी सुविधा सुरू करण्याचा प्रस्ताव

मुंबई: कैदी म्हणजे एखाद्या बंदिस्त, अंधारकोठडीच्या खोलीत डांबून ठेवलेला, दिवस आहे की रात्र हे सुद्धा त्याला कळू न देणे अशी परिस्थिती काही वेळा असते. तर काही वेळा आपल्या नातेवाईकांना महिन्यातून किंवा त्याहीपेक्षा अधिक काळ पत्नी, मुले किंवा इतर नातेवाईकांशी भेटू दिले जायचे नाही. परंतु आता राज्यातील कारागृहांमध्ये शिक्षा भोगणार्‍या 20 हजार कैद्यांना त्यांच्या नातेवाइकांशी विनाअडथळा संवाद साधता यावा यासाठी कारागृहांमध्ये ‘पीसीओ’ची सुविधा सुरू करण्याचा प्रस्ताव कारागृह विभागाने तयार केला आहे.

पुण्यातील येरवडा तुरुंगात प्रायोगिक तत्त्वावर प्रथम अशा प्रकारचे दूरध्वनी बसविण्यात येणार आहेत. कारागृहात छुप्या मार्गाने होणारी मोबाईलची तस्करी रोखण्यासाठी हा प्रयोग केला जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव लवकरच मान्यतेसाठी गृहविभागाकडे पाठवण्यात येणार आहे.

राज्यातील ५६ कारागृहांमध्ये सध्या २० हजार कैदी शिक्षा भोगत असून त्यांना या सुविधेचा लाभ होणार आहे. कारागृहांमध्ये हा उपक्रम राबवण्यासाठी आम्ही विविध फोन सेवा पुरवणा-या कंपन्यांशी संपर्क साधला आहे. मात्र आम्हाला हवे तसे फोन अद्याप मिळालेले नाहीत. तसेच कंपन्यांनी आमच्या अपेक्षेपेक्षा अधिक रक्कम मागितली आहे. त्यामुळे अद्याप त्यावर काम सुरू असल्याचे मुंबईतील एका कारागृह अधिका-याने सांगितले. याबाबत येरवडा कारागृह प्रशासनाने पूर्ण आरखडा तयार केला असून तो मुख्यालयाला पाठवण्यात आला आहे.

आता हा प्रस्ताव गृहविभागाकडे पाठवण्यात येणार असल्याचे येरवडा कारागृह अधिकार्‍याने सांगितले. या उपक्रमांतर्गत फोनच्या सुविधेसाठी कैद्यांना प्रथम ३०० ते ५०० रुपये भरून कारागृह प्रशासनाकडे नावनोंदणी करावी लागेल. या सुविधेसाठी त्यांना त्यांच्या दोन नातेवाईकांचे दूरध्वनी क्रमांक नोंदवण्याची मुभा देण्यात येईल. हे दूरध्वनी क्रमांक आणि त्यांच्या नातेवाईकांची पडताळणी स्थानिक पोलिसांमार्फत केली जाईल. त्यासाठी नोंदणीकृत कैद्याचे बायोमेट्रिक यंत्रणेत बोटांचे ठसे घेण्यात येतील. त्यानुसार या यंत्रणेचा वापर करून कैदी दूरध्वनी वापरू शकतील.

दूरध्वनी केल्यानंतर ठराविक वेळेतंच त्यांना नातेवाईकांशी संवाद साधता येईल. त्यानंतर दूरध्वनी अपोआप बंद होतील. सुरक्षेच्या दृष्टीने एक कारागृह कर्मचारी व सीसीटीव्हीच्या माध्यमातून या सर्व संभाषणावर लक्ष ठेवणार असल्याचेही या अधिका-याने स्पष्ट केले. सुरुवातीला फाशी व जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कैद्यांनाच ही सुविधा पुरवण्यात येणार आहे. येरवडा तुरुंगानंतर इतर कारागृहांमध्येही अशा पद्धतीने दूरध्वनी बसवण्यात येणार असल्याचे या अधिकार्‍याने सांगितले.

Leave a Comment