कृषिमंत्र्यांच्या बैठकीला खासदारांची दांडी

औरंगाबाद: महिन्यातून एक दिवस पाणी मिळणार्‍या जालना जिल्ह्याची दारूण परिस्थिती केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पाहिल्यानंतर सोमवारी त्यांच्या उपस्थितीत औरंगाबादेत मराठवाड्यातील खासदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या माध्यमातून केंद्र शासनाकडून दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या पदरात काही पाडून घेण्याची संधी खासदारांना होती. मात्र, त्यांनी या बैठकीकडे दुर्लक्ष करुन दुष्काळाबाबत त्यांची ‘संवेदनशीलता’ दाखवून दिली आहे.

सोमवारी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीला मराठवाड्यातील सहा खासदारांनी दांडी मारली. यामुळे लोकप्रतिनिधींना दुष्काळाची किती चिंता आहे; हे उघड झाल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून उमटंत आहेत.

मराठवाड्याच्या सात खासदारांपैकी सहा जणांनी या बैठकीला दांडी मारली. त्यात जालन्याचे रावसाहेब दानवे (भाजप), बीडचे गोपीनाथ मुंडे (भाजप), नांदेडचे भास्करराव पाटील-खतगावकर (काँग्रेस), लातूरचे जयंत आवळे (काँग्रेस), परभणीचे तुकाराम रेंगे (शिवसेना), हिंगोलीचे सुभाष वानखेडे (शिवसेना) यांचा समावेश आहे. औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे, उस्मानाबादचे खासदार पद्मसिंह पाटील आणि खासदार रजनीताई पाटील या बैठकीस उपस्थित होत्या. मात्र इतर सहा खासदार कोणत्या कारणामुळे उपस्थित राहू शकले नाहीत याची चौकशी करावी; अशी मागणी उपस्थितांतून होत आहे.