ओस्ट्रेलियाविरुद्ध दोन कसोटी सामन्यांसाठी संघ जाहीर

मुंबई: ऑस्ट्रेलिया संघाबरोबर होणार्या पहिल्या दोन क्रिकेट कसोटी सामन्यांसाठी संघ जाहीर करण्यात आला असून त्यातून सातत्याने अपयशी ठरत असलेल्या सलामीवीर अगुतम गंभीरला डच्चू देण्यात आला आहे तर फिरकीपटू हरभजन सिंग याला पुनरागमनाची संधी देण्यात आली आहे.

पंधरा जणांच्या या संघात गंभीर ऐवजी शिखर धवन याला संधी मिळाली आहे; तर तीन फिरकीपटू घेऊन खेळण्याच्या निर्णयामुळे अनुभवी भज्जीच्या साथीला आर. अश्विन आणि प्रग्यान ओझा यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. जहीर खान, इरफान पठाण आणि उमेश यादव दुखापतीतून सावरत असून त्यांच्याऐवजी एकदिवसीय सामन्यात आपल्या वेगवान गोलंदाजीचा प्रभाव पाडणार्या भुवनेश्वर कुमारला संधी देण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसापासून फॉर्म हरवलेल्या आणि दुखापतींचा सामना करणाऱ्या धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहेवागवर संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीचा विश्वास कायम आहे. त्यामुळे स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दीर्घ काळ अपयशी ठरूनही सेहेवागचे स्थान संघात कायम ठेवण्यात आले आहे. अर्थात मुरली विजय आणि धवन ही पर्यायी सलामीवीरांची जोडी निवड समितीने तयार ठेवली आहे.

ऑसी संघाबरोबरच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी जाहीर करण्यात आलेला भारतीय संघ असा आहे- महेंद्रसिंग धोनी (कर्णधार, यष्टीरक्षक), वीरेंद्र सेहवाग, मुरली विजय, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, सचिन तेंडूलकर, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, प्रग्यान ओझा, हरभजन सिंग, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, अशोक दिंडा

Leave a Comment