सोनिया गांधी, नरेंद्र मोदींचा महाकुंभ दौरा रद्द

अलाहाबाद: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी येत्या काही दिवसांमध्ये महाकुंभामध्ये हजेरी लावणार होत्या. त्यांच्या दौर्‍यासाठी उत्तर प्रदेश सरकारकडून प्रतिसाद अपेक्षित होता. परंतु, समाजवादी पार्टीच्या सरकारने अतिशय विलंब केला. उत्तर प्रदेश सरकारने पुरेशी सुरक्षा पुरविण्यास असमर्थता व्यक्त केल्यानंतर सोनियांचा महाकुंभ दौरा रद्द करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश सरकारकडून अशा प्रकारचा निर्णय कळविल्यानंतर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे.

उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते किशोर वर्शने यांनी समाजवादी पक्षाने सोनिया गांधींनी कुंभ मेळ्यात हजेरी लावू नये यासाठी हे नाटक केल्याचा आरोप केला. ते म्हणाले की; सन २००१ मध्ये तत्कालीन भारतीय जनता पक्षाच्या सरकारने सोनिया गांधींना रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले होते. तरीही सोनियांनी कुंभ मेळ्यात हजेरी लावून शाही स्नान केले होते. परंतु सध्या देशातील परिस्थिती पाहता सोनियांनी यावेळी दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला. राहुल गांधी यांचाही दौरा नियोजित आहे. परंतु त्यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही; असेही त्यांनी सांगितले. सोनिया गांधी यांनी त्रिपुरा दौराही रद्द केला आहे. यामागे प्रकृती अस्वास्थ्य हे कारण सांगण्यात आले आहे. त्रिपुरामध्ये या महिन्यात विधानसभा निवडणुका आहेत.

दरम्यान; गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचाही महाकुंभ दौरा रद्द झाला आहे. दि. १२ फेब्रुवारी रोजी मोदी महाकुंभ मेळ्याला भेट देणार होते. परंतु कुंभ मेळ्यात होत असलेल्या राजकीय हालचालींबाबत उत्तर प्रदेश सरकारने नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे मोदींचा दौरा रद्द होण्यामागे राजकीय कारण असल्याची चर्चा आहे. आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊनच हे राजकारण केल्याचे बोलले जात आहे.

Leave a Comment