अब्दुल्लांना पुन्हा आला अफजलचा पुळका

श्रीनगर: अफझल गुरूच्या फाशीनंतरही गुरूचे भूत मात्र भारताच्या मानगुटीवरून उतरलेले नाही. एकीकडे कश्मीरमध्ये तणावाचे वातावरण असताना कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही या शिक्षेवर अनेक प्रश्नांची सरबत्ती केंद्र सरकारवर केली आहे. फाशीआधी अफझलच्या कुटुंबियांना त्याला भेटू दिले नाही हे माणुसकीला शोभणारे नाही; अशी टीका अब्दुल्ला यांनी केली आहे.

अफझल गुरूला शनिवारी सकाळी तिहार जेलमध्ये फाशी देण्यात आली. अफझल हा कश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर गावातील रहिवासी होता. त्यामुळे त्याच्या फाशीबाबत अंतिम निर्णय झाल्यानंतर शुक्रवारीच कश्मीरचे मुख्यमंत्री म्हणून अब्दुल्ला यांना त्याबाबत पूर्वकल्पना देण्यात आली. याबाबत आपल्याला केंद्र सरकारकडून कळवण्यात आले होते; असे सांगत काल अब्दुल्ला यांनी त्याला दुजोरा दिला होता. मात्र आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी आपला रंग बदलत अफझलच्या कुटुंबियांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला.

अब्दुल्ला पुढे म्हणाले की; मुंबई हल्ल्यातील अतिरेकी अजमल कसाबला फाशी देण्यात आल्यानंतर अफझललाही फाशी दिली जाणार हे मी गृहीतच धरले होते. मला फाशीबाबत कळवण्यात आल्यानंतर तातडीने वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेऊन सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. सरकारकडून सुरक्षेत कोणतीही कुचराई होणार नाही याची सर्व ती काळजी घेण्यात आली. त्यामुळे कश्मीरमध्ये अजूनही परिस्थिती नियंत्रणात आहे. फाशीनंतरचा संभाव्य उद्रेक टाळण्यात सरकारला यश आले असले तरी या शिक्षेचे दूरगामी परिणाम फार वेगळे असू शकतात; असेही अब्दुल्ला म्हणाले.

अफझलच्या बाबतीत न्यायालयीन प्रक्रियेचे योग्य पालन करण्यात आले नाही; अशी टीक करून या फाशीने काश्मिरी जनतेमध्ये चुकीचा संदेश जाईल. आपल्याला न्याय मिळत नाही अशी भावना त्यांच्यात वाढेल असे अब्दुल्ला म्हणाले.

पंतप्रधान, मुख्यमंत्री यासारख्या महत्वाच्या व्यक्तींच्या हत्येचा आरोप असलेले गुन्हेगार आधीपासून फाशीच्या रांगेत असताना त्याआधी अफझलला फाशी का देण्यात आली; असा सवालही कश्मीरींच्या मनात आहे; असे अब्दुल्ला यांनी सांगितले .

दरम्यान, कश्मीरमध्ये आज दुसर्‍या दिवशीही संचारबंदी कायम आहे. किरकोळ हिंसेच्या घटना वगळता कश्मीर खोरे शांत आहे. त्याचवेळी मोबाईल व इंटरनेट सेवा अजूनही बंदच आहेत. केबल सेवा मात्र सुरू करण्यात आली आहे. सध्या काहीसे तणावपूर्ण वातावरण आहे. पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे.