दहशतवादी अफजल गुरूला फाशी

नवी दिल्ली, दि. ९ – संसदेवर २००१ साली झालेल्या हल्ल्यातील दोषी दहशतवादी अफजल गुरू याच्या दयेचा अर्ज राष्ट्रपतींनी काही दिवसांपूर्वी फेटाळला असून शनिवारी (आज) पहाटे अफजल गुरूला फाशी दिली आहे. अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी दिली. दरम्यान, अफजलला फाशी देण्यात आल्यानंतर काश्मीर खोऱ्यात संचारबंदी लागू करण्यात आली असून, मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

संसदेवर १३ डिसेंबर २००१ साली दहशतवादी हल्ला झाला होता. त्या प्रकरणी अफजल गुरुला अटक झाली होती. सर्वोच्च न्यायालयाने २००४ साली अफजलला मृत्युदंड सुनावला होता. त्याला ऑक्टोबर २००६ मध्ये फाशी दिली जाणार होती. पण त्याच्या पत्नीने दयेचा अर्ज दाखल केला होता. अफजलचा दया अर्ज फेटाळण्याची शिफारस केंद्रीय गृह खात्याने २३ जानेवारी २०१३ रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना केली होती. त्यानुसार २६ जानेवारीला राष्ट्रपतींनी अफजलचा दयेचा अर्ज फेटाळला. त्यानंतर शनिवारी (९ फेब्रुवारी) पहाटे ६ वाजून २५ मिनिटांनी अफजलला तिहार तुरुंगात फाशी देण्यात येणार होती. त्यानुसार अफजलला फाशी दिली असल्याचे वृत्त आहे.

गुरू याला फासावर लटकविल्यानंतर दहशतवादी शक्ती डोके वर काढण्याची शक्यता असून अलाहाबाद येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यासह मुंबई, दिल्ली, बंगळूरू या ठिकाणी दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता गुप्तचर संस्थांनी वर्तविली आहे. अफजलला फाशी दिल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच जंतर मंतर येथे अफजल समर्थक आणि विरोधक; अशा दोघांनी धाव घेतली. या ठिकाणी त्यांच्यात झटापटही झाल्याचे वृत्त आहे. राजधानी दिल्लीत अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

काश्मीरच्या खोर्‍यातही गुरूच्या फाशीचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता लक्षात घेऊन काश्मीरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संवेदनशील ठिकाणे आणि फुटीरतावादी नेत्यांच्या घरांवर निमलष्करी दल आणि पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Leave a Comment