तज्ज्ञांनी तोडले अकलेचे तारे

psycoमुंबई: मानसिक रुग्णांना समुपदेशन आणि उपचारांनी सावरण्यास मदत करणारे मनोविकार तज्ज्ञांचे डोके ठिकाणावर आहे का; अशी शंका येण्यासारखे अकलेचे तारे इंडियन सायकिएट्रिस्ट सोसायटीच्या अध्यक्षांनी तोडले. सर देश लैंगिक अत्याचार रोखण्याच्या उपायांचा शोध घेत असताना; ‘विशी ओलांडली की लगेच मुला-मुलींची लग्न लाऊन द्या’; असा ‘सोप्पा’ उपाय या महोदयांनी सुचविला आहे.

दिल्लीत घडलेल्या अघोरी सामूहिक बलात्कारानंतर उभा देश हादरून गेला. शासन व्यवस्था आणि न्यायव्यवस्थेसह सर्व यंत्रणा लैंगिक अत्याचार रोखण्याच्या उपायांचा शोध घेत आहेत. तरीही देशभरात बलात्कार आणि अत्याचारांचे सत्र सुरूच आहे.

मनोविकार तज्ज्ञांसारख्या मंडळींनी तर या बाबतीत अधिकंच संवेदनशीलपणे विचार करण्याची अपेक्षा आहे. मात्र इंडियन सायकिएट्रिस्ट सोसायटीच्या नवनिर्वाचित अध्यक्षा डॉ. इंदिरा शर्मा यांनी सुचविलेला उपाय आपण नक्की कोणत्या युगात वावरंत आहोत; असा प्रश्न निर्माण करतो.
एका प्रतिष्ठीत माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत डॉ. शर्मा यांनी या समस्येचे सोपे विश्लेषण केले आहे.

त्यांच्या म्हणण्याप्रमाणे; हल्ली विशी, पंचविशीत मुले कमावती होतात. त्यांच्या हातात पैसा खुळखुळतो. त्यांच्याकडे मोकळा वेळही असतो. त्यांच्यावर पालकांचे नियंत्रण रहात नाही. मग ती मुले व्यसनी होतात आणि त्यातून नको ते प्रकार घडतात. त्यामुळे मुलांचे लवकरात लवकर लग्न लाऊन द्यावे; असे डॉ . शर्मा सुचवितात.

अर्थात बहुसंख्य मनोविकार तज्ज्ञांनी या मताला विरोध केला असून त्याची तुलना खाप पंचायतीच्या फतव्याशी केली आहे. या अगाध मनोविश्लेषणाने या अध्यक्षांनी एक वादाचे वादळ अंगावर ओढवून घेतले आहे हे निश्चित!