‘जय महाराष्ट्र ढाबा बठिंडा’ ‘व्हॅलेंटाईन डे’ला होणार प्रदर्शित

‘‘कोल्हापूर टू बठिंडा’ असा प्रवास करायला लावणारा अवधूत गुप्ते दिग्दर्शित ‘जय महाराष्ट्र ढाबा बठिंडा’ हा चित्रपट ‘व्हॅलेंटाईन डे’च्या मुहूर्तावर १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे.

‘एकवीरा प्रॉडक्शन’ निर्मित आणि ‘ए स्क्वेअर एन्टरटेन्मेट’ आणि ‘ब्लॅक गोल्ड फिल्म्स’ प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती अतुल कांबळे, अवधूत गुप्ते यांनी केली आहे. ‘जय महाराष्ट्र ढाबा बठिंडा’ची प्रेमकथा कोल्हापुरी मराठी मुलगा सयाजी निंबाळकर आणि पंजाबी मुलगी जसपींदर कौर यांच्याभोवती फिरते. पंजाबची पार्श्वभूमी आणि वातावरणनिर्मिती चित्रपटात यावी यासाठी खास पंजाबमध्ये जाऊन चित्रिकरण करण्यात आले. या चित्रपटामुळे पहिल्यांदाच मराठी सिनेमा पंजाबमध्ये पोहोचला.

या निमित्ताने बॉलिवूडची लोकेशन्स आता मराठी फिल्म्समधेही पहायला मिळतील. ‘यमला पगला दिवाना’, ‘सन ऑफ सरदार’ या चित्रपटात दाखवण्यात आलेली हवेली या चित्रपटात बघायला मिळणार आहे. या चित्रपटाचं चित्रिकरण चालू असताना पंजाबमध्ये हुडहुडी भरायला लावणारी थंडी होती. त्या थंडीत हे चित्रीकरण पार पडले. रोमॅंटिक चित्रपटाला साजेसे संगीत नीलेश मोहरिर याने दिलं असून त्यातून पंजाबी आणि मराठी संस्कृतीचा उत्तम मिलाफ साधला गेला आहे.

पंजाबी बाज हिंदी चित्रपटात वारंवार पहायला मिळतो. पण आता मराठी चित्रपटही अशी भुरळ घालणार आहे. दिग्दर्शक अवधूत गुप्ते ‘झेंडा’ आणि ‘मोरया’ या दोन चित्रपटानंतर ‘जय महाराष्ट्र ढाबा बठिंडा’ या चित्रपटातून पंजाबच्या पार्श्वभूमीवर आधारित असलेली प्रेमकथा घेऊन येत आहे.

Leave a Comment