कॅग आणि सरकारमध्ये पुन्हा जुंपली

नवी दिल्ली: सरकारला कॅगची गरज नाही. कॅगने त्याचे काम करावे आणि सरकारला त्याचे काम करू द्यावे; असे विधान काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी केले.

कॅगच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत भारताचे नियंत्रक आणि महालेखा परिक्षक विनोद राय यांच्या विधानावरून सरकार आणि कॅग यांची पुन्हा जुंपण्याची चिन्हे आहेत. कोळसाकांड आणि स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या अहवालावरून आधीच राय यांच्यावर सत्ताधारी दात धरून आहेत.

अमेरिकेत कॅगच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका परिषदेत विनोद राय म्हणले की; सध्याच्या काळात भारतीय लोकशाही प्रगल्भ होत आहे. विशेषत: शहरी मध्यमवर्ग आपल्या हक्कांबाबत जागरूक होत आहे. अशावेळी कॅगने आपले अहवाल केवळ संसदेला सादर करण्याऐवजी त्याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याबाबत विचार करण्याची वेळ आली आहे; असे प्रतिपादन राय यांनी केले. सरकारने केवळ काही भांडवलदारांना फायदेशीर धोरण निश्चित करण्याऐवजी एकूण उद्योग क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने धोरण आखले पाहिजे; अशी टिपण्णीही त्यांनी केली.

या विधानांवर दिग्विजय सिंह यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कॅगने लेखापरीक्षण करायचे नाही तर काय पंतप्रधान व्हायचे; असा उपरोधात्मक सवाल करून राय यांना उद्देशून ते पुढे म्हणाले की; त्यांना जर व्यवस्थेत काही दोष दिसत असतील तर त्यांनी राजकारणात यावे.