कांगारूंविरुद्ध टीम इंडियाचे पारडे जड- भज्जी

टीम इंडिया मायभूमीत कांगारूंना क्लीनस्वीप देण्यात यशस्वी होईल आणि ऑस्ट्रेलिया दौ-यातील पराभवाचा हिशेबही चुकता करण्यात यशस्वी ठरेल, असा विश्वास संघात पुनरागमनासाठी प्रयत्न करीत असलेला भारताचा ऑफस्पीनर हरभजनसिंगने व्यक्त केला आहे. आगामी कसोटी मालिकेत टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला ४-० ने चीत करून क्लीन स्वीप देईल असे त्याला वाटते.

गोल्फ प्रीमियर लीगची फ्रँचायझी टीम उत्तराखंड लायन्सची टीम जर्सी आणि स्लोगन लाँच करण्यासाठी फिरकीपटू हरभजनसिंग दिल्लीत आला होता. याप्रसंगी तो प्रसारमाध्यमाशी बोलत होता. यावेळी बोलताना भज्जी म्हणाला, ‘ गेल्या काही दिवसात ऑस्ट्रेलियाची टीम काहीसी घसरली आहे. पूर्वीप्रमाणे त्यांची कामगिरी होत नाही. स्टिव वॉ किंवा रिकी पाँटिंगच्या काळात ऑस्ट्रेलियाची टीम जशी मजबूत असायची, तशी भारत दौ-यावर येणारी टीम प्रबळ नाही. यामुळे टीम इंडियाला त्यांचा सहज पराभव करण्याची संधी चालून आली आहे. ‘

इंग्लंडविरुद्ध काही दिवसापूर्वी झालेल्या मालिकेत टीम इंडियाला आपली चुणूक दाखविता आली नाही. त्यामुळे ब-याच वर्षानंतर टीम इंडियाला मायभूमीत पराभव सहन करावा लागला होता. मात्र, गेल्या काही दिवसात टीम इंडियाच्या कामगिरीत काहीसी सुधारण झाली आहे. त्यामुळे आगामी काळात ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकू, असाही भज्जी म्हणाला.

Leave a Comment