नवी दिल्ली: दूरसंचार विभागाच्या 2 जी स्पेक्ट्रम प्रकरणी सन 2008 साली लिलावाची माहिती देणारी जी प्रेस नोट आपण मंजुर केली होती त्यात ऐनवेळी बदल करून ती प्रसिद्धीला दिली गेली अशी माहिती अॅटर्नी जनरल जी. ई. वहानवटी यांनी आज या प्रकरणाची चौकशी करणार्या संसदीय समितीपुढे दिली.
2 जी प्रकरणी प्रेसनोट बदलली गेल्याचा वहानवटींचा आरोप
वहानवटी यांची आज 2 जी घोटाळ्याची चौकशी करणार्या संयुक्त चौकशी समितीपुढे साक्ष झाली. त्यावेळी वहानवटी म्हणाले की; 2 जी स्पेक्ट्रमच्या लिलावाची माहिती प्रसिद्ध करण्यासाठी दूरसंचार विभागाने मला एक प्रेस नोट दाखवली. आपण ती मंजूर केली परंतु प्रत्यक्षात जी प्रेसनोट छापून आली त्यात आपण मंजूर केलेल्या प्रेस नोट पैकी काही भाग गायब होता. त्यात काही बदल केले गेले असे आपल्या निदर्शनाला त्यावेळी आले होते. हीच माहिती आपण सीबीआयलाही दिली आहे. त्यामुळे दूरसंचार विभागातर्फे अंतिमत जी प्रेसनोट प्रसिद्धीला दिली गेली त्याच्याशी आपला काही संबंध नाही असेही वहानवटी यांनी सांगितले.
2 जी स्पेक्ट्रम प्रकरणी लिलाव केला गेला वहानवटी हे सॉलिसिटर जनरल म्हणून काम पहात होते. त्यामुळे संयुक्त संसदीय चौकशी समितीने त्यांना साक्षीसाठी बोलावले होते. सॉलिसिटर जनरल या नात्याने वहानवटी यांनी दूरसंचार विभागाच्यावतीने अनेक खटले चालविले आहेत. टेलिकॉम ट्रॅब्युनलपुढेही त्यांनी दूरसंचार विभागाची बाजू मांडली आहे. त्यामुळे त्यांच्या साक्षीला या प्रकरणात महत्व आहे.
त्यांच्यासह अन्यही वरीष्ठ अधिकार्यांना तसेच विधी आणि न्याय विभागाच्या अधिकार्यांना संयुक्त संसदीय चौकशी पुढे साक्षीसाठी बोलावण्यात आले आहे.