पाकिस्तानी नेत्यांनी घेतली पुन्हा काश्मीरींची कड

इस्लामाबाद: काश्मीरी जनतेने आपल्या न्याय हक्कासाठी जो लढा हाती घेतला आहे त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे; असे पाकिस्तानातील अनेक वरीष्ठ नेत्यांनी नमूद करीत भारताबरोबर होणार्‍या पुढील कोणत्याही चर्चेत या विषयावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहनही केले आहे.

मंगळवारी काश्मीर सद्भावना दिन होता. पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीर मध्ये दर वर्षी काश्मीर सद्भावना दिन 5 फेब्रुवारीला साजरा केला जातो.

या दिनानिमीत्त दिलेल्या संदेशात अध्यक्ष असीफ अली झरदारी आणि पंतप्रधान राजा परवेझ अश्रफ यांनी काश्मीरी जनतेच्या लढ्याला राजकीय आणि नैतिक पाठिंबा व्यक्त केला. काश्मीरच्या प्रश्‍नावर शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढण्यास आम्ही वचनबद्ध आहोत असे झरदारी यांनी आपल्या संदेशात नमूद केले आहे.

पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की या प्रश्‍नावर राजकीय तोडगा काढण्यासाठी आम्ही नेहमीच भारताशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. काश्मीरचा प्रश्‍न हा संयुक्त राष्ट्रांनी संमत केलेल्या ठरावानुसार आणि काश्मीरी जनतेच्या मतानुसार संमत केला जावा अशीही पाकिस्तान सरकारची भूमिका आहे असे त्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment