सिमला: हिमाचलप्रदेशातील किन्नौर जिल्ह्यातील काफनू गावात दोन घरांवर बर्फाचा कडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात सर्तकतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. हिमाचलपप्रदेशमध्ये मोठया प्रमाणावर झालेल्या बर्फवृष्टीमुळे किनौर जिल्हयात सहाफूटापर्यंत बर्फ जमा आहे.
भाभा खो-यातील काफनू गावात प्रशासनाकडून मदत आणि बचावकार्य सुरु आहे. मंगळवारी रात्री काफनू गावातील दोन घरांवर बर्फाचा कडा कोसळला या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे असे उपविभागीय दंडाधिकारी कल्पा प्रशांत देष्टा यांनी सांगितले. या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या प्रशासनाने तात्काळ आसपासच्या सहा घरातील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवले.
किन्नौर जिल्ह्यात सतत बर्फवृष्टी सुरु आहे. मंगळवारी येथे चारफुटापर्यंत बर्फ जमा होता. बुधवारी सकाळी सहाफुटापर्यंत बर्फ जमा झाला. बर्फाचे कडे कोसळण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने जिल्हयातील नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या आहेत.
तात्काळ उपाचारासाठी किन्नौरमधील रुग्णालये आणि अग्निशमन दलाला सज्ज ठेवण्यात आले आहे. मंगळवारी खंडीत वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला पण बुधवारी पून्हा एकदा वीजपुरवठा खंडीत झाला.