बंगलोर: संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच डीआरडीओच्या कामाबद्दल आपण समाधानी आहोत परंतु या संस्थांच्या विविध प्रकल्पांना जो विलंब होतो त्याबद्दल आपण नाराज आहोत. विशेषत: हलक्या लढाऊ विमानांच्या उत्पादनाला जो विलंब झाला आहे त्याबद्दल आपण खूपच अधीर झालो आहोत; अशा शब्दात संरक्षण मंत्री ए. के. अॅन्टोनी यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
येथे आयोजित करण्यात आलेल्या एका आंतरराष्ट्रीय परिसंवादात बोलताना त्यांनी आपली नाराजी उघड केली. डीआरडीओच्या वैज्ञानिकांना उद्देशून ते म्हणाले की; तुम्ही तुमच्या संशोधनासाठी खूपच वेळ घेता तो कमी करा आणि कामाचा वेग वाढवा. प्रकल्पांना होणारा विलंब कोणत्याही परिस्थितीत टाळलाच गेला पाहिजे.
डीआरडीओतर्फे तेजस नावाचे हलके लढाऊ विमान तयार केले जात आहे. त्याच्या दुसर्या ऑपरेशनल क्लिअरन्सची सध्या प्रतीक्षा आहे परंतु मला शक्य तितक्या लवकर याचे अंतिम ऑपरेशनल क्लिअरन्स हवे आहे. त्यासाठी मी अधीर आहे. हा प्रकल्प २० वर्षांपासून अधिक काळ प्रलंबित आहे. हे विमान प्रत्यक्ष वापरात आणण्यासाठी शक्य तितक्या लवकर प्रयत्न केले जावेत अशी सूचनाही त्यांनी डीआरडीओच्या वैज्ञानिकांना केली.
हिंदुस्थान एरोनॉटिक्स कडून इंटरमिडीएट जेट ट्रेनरच्या प्रकल्पालाही जो विलंब होत आहे त्या विषयीही त्यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की; हवाई दलाकडून याला विलंब होत असल्याचे सांगितले जात आहे. पुढील परिषदेपर्यंत हाही प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे अशी अपेक्षा संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केली.
अशा प्रकारच्या प्रकल्पांना होत असलेल्या विलंबाबद्दल हवाईदलाचे प्रमुख एन ए के ब्राऊनी यांनीही नाराजी व्यक्त केली. आपले अनेक महत्वाचे प्रकल्प विलंबामुळे अडकल्याने संरक्षण दलांच्या आधुनिकीकरणाला विलंब होत आहे. अशा प्रकारच्या विलंबाबद्दल आर्थिक दंड करण्याची सूचनाही त्यांनी केली. एक तर अशा विलंबाबद्दल संबंधीतांना दंड करा किंवा त्या प्रकल्पावर झालेला खर्च त्यांच्याकडून वसूल करा असेही त्यांनी यावेळी सुनावले.