गुजरातेत पेड न्यूजची चारशे प्रकरणे- निवडणूक आयोग

नवी दिल्ली: गुजरातेत झालेल्या विधानसभांच्या निवडणुकीत पेड न्यूजची चारशे चौदा प्रकरणे उघडकीला आली असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले असून या प्रकरणी कारवाई केली जात आहे.

पेडन्युजच्या वाढत्या प्रकाराबद्दल निवडणूक आयोगाने चिंता व्यक्त केली आहे. गुजरातमध्ये निवडणूक काळात पेड न्यूजची प्रकरणे शोधण्यासाठी निवडणूक आयोगाने राज्य तसेच जिल्हा पातळीवर छाननी समित्या नेमल्या होत्या. त्या समित्यांपुढे आलेल्या तक्रारींची छाननी केल्यानंतर ही प्रकरणे स्पष्ट झाली आहेत. या प्रकरणी सुमारे पाचशे नोटीसा संबंधीतांना बजावण्यात आल्या होत्या.

केवळ प्रिन्ट मिडीयातंच नव्हे; तर इलेक्ट्रॉनिक मिडीयातही हे प्रकार घडत असल्याचे या निवडणुकीत दिसून आले आहे. याची माहिती घेऊन पेड न्यूज म्हणून उमेद्वाराने दिलेले पैसे त्याच्या निवडणूक खर्चात धरले जाणार आहेत.

ज्या माध्यम कंपन्या किंवा समूहांनी या पेड न्यूज घेतल्या आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस निवडणूक आयोगाने प्रेस कौन्सिलकडे केली आहे. या प्रकरणात निवडणूक आयोग आता अत्यंत गंभीर असून गेल्या ऑक्टोबर महिन्यात उत्तरप्रदेशातील एका आमदाराने पेडन्यूज दिल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला अपात्र घोषित करण्यात आले आहे. अशा प्रकरच्या कारवाईचे देशातील हे पहिले प्रकरण आहे.

Leave a Comment