कौशल्य विकसित करण्यासाठी स्थापणार दोनशे ‘कम्युनिटी कॉलेज’

नवी दिल्ली: उच्चशिक्षण घेणार्‍या युवकांमध्ये कौशल्य विकसित करण्यासाठी देशातील विद्यमान महाविद्यालयांमध्ये तसेच तंत्रनिकेतन विद्यालयांमध्ये कम्युनिटी कॉलेजेस उभारली जाणार आहेत. अशा प्रकारची दोनशे कॉलेजेस उभारण्याचा प्रस्ताव आहे आणि येत्या शैक्षणिक वर्षांपासून ती कार्यरत होणार आहेत.

मनुष्यबळ विकास मंत्री पल्लम राजू यांनी सांगितले की गेल्या वर्षी राष्ट्रीय व्यवसाय शिक्षण पात्रता फ्रेमवर्क अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी या माध्यमातून केली जाणार आहे. कृषी, उद्योग, सेवा क्षेत्र अशा व्यवसायांमध्ये काम करण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्ये येथे विकसित केली जाणार आहेत. त्याचा विद्यार्थ्यांना थेट लाभ होऊन त्यांना यातून रोजगारही मिळू शकणार आहे.

उद्योगांना ज्या प्रकारचे मनुष्यबळ अपेक्षित आहे त्या प्रकारचे मनुष्यबळ तयार करण्यासाठी या योजनेच्या संचालक मंडळांवर उद्योगांचेही प्रतिनिधी घेतले जाणार असल्याचे पल्लम राजू यांनी सांगितले. याचे वैशिष्ट म्हणजे कोणत्याही वयोगटातील लोकांना या कॉलेजमध्ये शिक्षण घेता येऊ शकणार आहे त्यामुळे त्यांच्यात रोजगारासाठी नवीन कौशल्ये विकसित होऊ शकणार आहेत.

Leave a Comment