बँड्गर्ल्सना धमकविणार्‍यांवर गुन्हे दाखल

श्रीनगर: काश्मीरमधील युवतींच्या बँडमध्ये सहभागी युवतींना सोशल नेटवर्किंग साईट्सच्या माध्यमातून जीवे मारण्याच्या धमकीसह आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणार्‍यांची ओळख श्रीनगर पोलिसांना पटली असून लवकरंच त्यांना अटक केली जाईल; अशी ग्वाही पोलिसांनी दिली.

काश्मीरमध्ये केवळ युवतींचा समावेश असलेल्या बेण्ड्सवर बंदी घालण्याचा फतवा मुख्य धर्मगुरू मुफ्ती बशीर दीन यांनी जारी केला. त्याचप्रमाणे महिलांनी गाणे- बजावणे इस्लाम विरोधी असल्याचे सांगत बँडमध्ये सहभागी युवतींना विविध वेब साईट्सवरून धमक्याही देण्यात आल्या.

या धमक्या देणार्‍यांची ओळख पटली असून त्यांच्याविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा; कलम ६६ (अ) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्याला ३ वर्ष कैद २ लाख रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही; अशी शिक्षा होऊ शकते; अशी माहिती श्रीनगर पोलिसांनी दिली.

काश्मीरात केवळ मुलींचा समावेश असलेले बँड पथक हे तेथील एक आगळे वैशिष्ट्य आहे. परंतु मुलींनी जाहीरपणे गायन आणि वादन करण्यास येथील प्रमुख मुफ्तींनी एक फतवा जारी करून बंदी घातली आहे. त्यामुळे या बँड पथकात काम करणार्‍या मुलींनी बँड पथकात काम करण्यास नकार दिला आहे.