अबोटाबादेत उभारले जातेय मनोरंजन पार्क

इस्लामाबाद दि. ५ – अमेरिकी सील कमांडोनी पाकिस्तानतील अबोटाबाद येथे घूसून अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनचा जेथे खातमा केला त्या गावात भले प्रचंड मनोरंजन पार्क उभारले जात असल्याचे समजते. अल कायदाचा कांही काळ बालेकिल्ला असलेल्या या शहरात पाकिस्तानची मिलीटरी अॅकॅडमीही आहे. पर्यटनाला चालना मिळावी म्हणून येथे मनोरंजन पार्क उभारले जात असल्याचे पख्तून प्रांताचे पर्यटन मंत्री सैयद अकील शाह यांनी या जागेचे भूमीपूजन करताना सांगितले असले तरी ओसामाच्या हत्येमुळे झालेली या भागाची बदनामी थोडी दूर करावी हाच त्यामागचा खरा उद्देश असल्याचे कांही सूत्रांकडून समजते.

सध्या ५० एकरांत बांधण्यात येत असलेल्या या मनोरंजन पार्कमध्ये स्मारक केंद्र, जलक्रेडा केंद्र, प्राणीसंग्रहालय, छोटे गोल्फ कोर्स व रेस्टॉरंट उभारले जात असून त्यासाठी तीन कोटी डॉलर्स म्हणजे १८० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. नंतर या पार्कचा विस्तार ५०० एकरांत केला जाणार आहे. सर्व काम पूर्ण होण्यासाठी ८ वर्षे लागतील असे सांगितले जात आहे.

हिमालयाच्या पायथ्याशी आणि इस्लामाबादेपासून ५० किमीवर असलेले अबोटाबाद ओसामा बिन लादेनच्या हत्येने एकदम चर्चेत आले होते. येथील एका घरातच ओसामा त्याची बायकामुले आणि सहकार्यांदसमवेत लपून बसला होता. २ मे २०११ रोजी अमेरिकेच्या सील कमांडोनी केलेल्या गुप्त कारवाईत तो ठार झाला. त्यानंतर ही जागा अल कायदासाठी पवित्र स्थळ बनू नये म्हणून ओसामा राहात असलेल्या घराचे कपौंड पाडून टाकण्यात आले आहे.

Leave a Comment