मद्यपि शेजार्‍याकडून युवतीवर बलात्काराचा प्रयत्न

नवी दिल्ली: बलात्काराच्या प्रयत्नात असलेल्या दारुड्या इलेक्ट्रिशिअनला विरोध करणार्‍या नवयुवतीवर त्या नराधमाने लोखंडी सळईने हल्ला चढविला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून युवतीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सोमवारी संध्याकाळी लजपतराय नगर येथे ही युवती घरात एकटीच असताना शेजारीच राहणारा इलेक्ट्रिशिअन मद्यधुंद अवस्थेत जबरदस्तीने घरात शिरला आणि त्याने या युवतीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोध करीत असताना या युवतीला घरात एक लोखंडी सळई हाताला लागली. ती त्या सळईने त्याला दूर करण्याचा प्रयत्न करीत होती. त्याचवेळी मदतीसाठी आरडा ओरडा करीत होती. तिचा आवाज बाहेर जाऊ नये; यासाठी इलेक्ट्रिशिअनने तिच्या हातातून सळई ओढून घेतली आणि त्यानेच तिचा गळा आवळून तिला मारहाण केली आणि पळून गेला. शेजारचे नागरिक तिचा आवाज ऐकून त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी या युवतीला रुग्णालयात दाखल केले.

राजधानीत धावत्या बसमध्ये झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे पडसाद अद्याप उमटत असून हा खटला विशेष द्रुतगती न्यायालयात सुरू आहे. महिलांना अधिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी केंद्र शासनाने नवीन अध्यादेशही नुकताच जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर राजधानीत ही निर्घृण घटना घडली.

Leave a Comment