नवी दिल्ली दि. ५- पुण्यात २००८ साली झालेल्या युवा राष्ट्रकुल स्पर्धेच्या समारोप प्रसंगी सुरेश कलमाडी यांच्या इच्छेखातर अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या नृत्यासाठी तब्बल ७१ लाख ७३ हजार रूपये खर्च केले गेले असे दिल्लीतील न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले आहे. कॉमनवेल्थ घोटाळा प्रकरणात भ्रष्टाचाराच्या आरोपांची सुनावणी या न्यायालयात होणार आहे.
भारतीय दंड विधान आणि भ्रष्टाचार विरोधी कायद्याप्रमाणे राष्ट्रकुल स्पर्धांचे अध्यक्ष सुरेश कलमाडी आणि त्यांच्या नऊ साथीदारांवर काल आरोप निश्चित करण्यात आले आहेत. त्यात आरोपींतील दोघे, जेम इंटरनॅशनलचे प्रमोटर पी. डी आर्य आणि ए.के. मदाने यांनी सुरेश कलमाडींनी सांगितल्यावरून आणि इच्छा व्यक्त केल्यावरून अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या नाचापोटी विझ क्राफ्ट इंटरनॅशनल प्रा.लि. कंपनीला हे पैसे चेकने अदा केले असल्याचे सांगण्यात आले.
दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धा दरम्यान कंत्राटे देताना करण्यात आलेल्या पैशांच्या घोटाळ्यामुळे सरकारचे ९० कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचाही आरोप कलमाडींवर असून या स्पर्धा आणि पुण्यात २००८ सालात पार पडलेल्या युवा राष्ट्रकुल स्पर्धा यांचा परस्पर संबंध आहे काय याचीही तपासणी या सुनावणीदरम्यान केली जाणार आहे.