सुरेश कलमाडी व अन्य नऊ जणांवर आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली दि.४ – दिल्ली न्यायालयात सोमवारी राष्ट्रकुल स्पर्धा घोटाळाप्रकरणी अध्यक्ष सुरेश कलमाडी व अन्य नऊ जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले. फसवणूक, फोर्जरी आणि गुन्हेगारी कट रचल्याचे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. आरोपपत्र दाखल करताना कलमाडींसह अन्य सर्व नऊ आरोपी न्यायालयात हजर होते. राष्ट्रकुल स्पर्धांसाठी वेगवेगळे करार करताना ९० कोटी रूपयांचा भ्रष्टाचार केला गेला असल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे.

आरोपपत्र दाखल होतानाच विशेष सीबीआय न्यायालयाने ही केस जलद चालवावी असेही आदेश दिले आहेत. त्यानुसार न्यायाधीश रविदर कौर यांनी पुढील सुनावणी ७ फेब्रुवारी रोजी ठेवली आहे असे समजते. सुरेश कलमाडी यांच्याबरोबरच कॉमनवेल्थ गेम्सचे महासचिव ललित भानोत, माजी महासंचालक व्ही. के वर्मा, माजी महासंचालक सुरजीत लाल, सहसंचालक अेएसव्ही प्रसाद, खजिनदार एम जयचंद्रन यांच्यावरही आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

भारतीय दंड कलमानुसार फसवणूक, गुन्हेगारी कट आणि प्रिव्हेन्शन ऑफ करप्शनखाली सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचार्यां नी केलेला गुन्हेगारी कट व गुन्हेगारी वागणूक या कलमांखाली हे आरोप ठेवले गेले आहेत.

Leave a Comment