सरकारला धोका नाही – शेट्टर यांचा आत्मविश्‍वास

बंगलोर: भाजपच्या काही सदस्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असला तरी आपल्या सरकारला कोणताही धोका नाही. आपण आपल्या सरकारचे पहिले अंदाजपत्रक येत्या शुक्रवारी सादर करणार आहोत असे कर्नाटकचे मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी म्हटले आहे.

सोमवारी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की; शुक्रवारी सकाळी आठ वाजता आपण आपल्या सरकारचा अर्थसंकल्प सादर करणार आहोत. काळजीचे काही कारण नाही. सरकारच्या कारभारावर विरोधकांकडून टीका केली जात आहे; त्या विषयी विचारले असता ते म्हणाले की; कोणत्याही विधायक टीकेचे सरकार स्वागतच करील. त्या अनुषंगाने सरकारी कामकाजात आवश्यक त्या दुरस्त्याही केल्या जातील.

या अधिवेशनात शेट्टर सरकारवर येडियुरप्पा समर्थक आमदारांच्या विरोधाची टांगती तलवार आहे. भाजपच्या तेरा आमदारांनी राजीनामे दिल्याने सरकार केवळ आता काठावरच्या बहुमतावर टिकून आहे. त्यामुळे येडियुरप्पा आणखी आक्रमक बनून सरकार पाडण्याची कृती करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कर्नाटक विधानसभेच्या अधिवेशनावर अस्थिरतेचे सावट आहे. राज्यपाल भारद्वाज यांनी विद्यमान सरकारला आपले बहमुत विधीमंडळाच्या पटलावर सादर करण्यास सांगितले आहे.

पहिल्या तेरा आमदारांपैकी बारा आमदारांचे राजीनामे सभापती बोपय्या यांनी स्वीकारले आहेत. एका आमदाराचा राजीनामा तांत्रिक कारणासाठी फेटाळण्यात आला. तशातच आणखी एका भाजप आमदाराने काल राजीनामा सादर केल्याने सरकारच्या स्थिरतेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

Leave a Comment