राजस्थान रॉयल्सला १०० कोटीची नोटीस

मुंबई: ‘आयपीएल’च्या राजस्थान रॉयल्स संघाला परकीय चलन व्यवहारातील अनियमिततेबद्दल सुमारे १०० कोटी रुपयांच्या दंडाची नोटीस सक्त वसुली विभागाने (इ.डी.) बजावली आहे.

परकीय चलन कायद्याचा भंग केल्या प्रकरणी ९८ कोटी ५० लाख रुपयांच्या दंडापैकी राजस्थान रॉयल्सची मालकी असलेल्या जयपूर आयपीएल क्रिकेट या कंपनीच्या संचालकांना ५० कोटी, या कंपनीशी संबंधित असलेल्या मॉरीशस येथील ई . एम. स्पोर्टींग होल्डिंग्ज या कंपनीला फोरेक्स शुल्क चुकविल्यापोटी ३४ कोटी रुपये दंडाची नोटीस इडीने बजावली आहे. याशिवाय इंग्लंड येथील मे. एनडी इन्व्हेस्टमेण्ट्स या कंपनीला साडेचौदा कोटी रुपयांच्या दंडाची नोटीस बजाविण्यात आली असून या कंपन्यांना दंड भरण्यासाठी ४५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

आयपीएल संघांशी संबंधित आर्थिक व्यवहार आणि परकीय चलनातील व्यवहारांची अनियमितता याबाबत इडी दोन वर्षापासून तपास करीत आहे. सहाव्या आयपीएल लिलावाच्या दुसर्‍याच दिवशी इडीने राजस्थान रॉयल्सला बजावलेली ही नोटीस या कारवाईअंतर्गत सर्वाधिक दंडाच्या रकमेची आहे.

Leave a Comment