मुलायमसिंगांना वेध मध्यावधी मिवडणुकीचे

नवी दिल्ली: संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारला खुर्चीवरून खाली खेचून यावर्षीच सार्वत्रिक निवडणुका घेण्याचे डावपेच समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांच्या डोक्यात घोळत आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर कधीही निवडणूक होणे शक्य असल्याने कामाला लागण्याच्या सूचना मुलायम यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांच्या बाहेरून पाठींब्यामुळे संपुआचे सरकार तग धरून आहे. सत्तेबाहेर राहून सत्तेवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने मुलायम अधून मधून सरकारला पाठींबा काढून घेण्याचे इशारे देत असतात. अनुसूचित जाती, जमातींना बढतीत आरक्षण देणारे विधेयक मंजूर केल्यास पाठींबा काढून घेण्याची धमकी त्यांनी नुकतीच दिली होती.

देशभरात महागाई, भ्रष्टाचार अशा विषयांवरून मतदारांमध्ये सत्ताधार्यांबाबत संताप आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाला अंतर्गत लाथाळ्यानी पोखरले आहे. या पार्श्वभूमीवर तिसरी आघाडी उभी करून पंतप्रधान पद पदरात पडून घेण्याची मुलायम यांची इच्छा आहे.

या पार्श्वभूमीवर मुलायमसिंग यांची मध्यावधी निवडणुकांची केवळ पोकळ धमकी आहे की त्यामागे व्यापक राजकारण शिजते आहे; याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

Leave a Comment