बलात्कारविरोधी कडक कायदा; अंमलबजावणीचे काय?

नवी दिल्ली- महिलांविरुद्धच्या लैंगिक अत्याचार करणार्‍यांना कठोर शासन करण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे. तथापि सन २००९ ते २०११ या काळात देशभरात बलात्काराच्या सुमारे 68 हजार घटना नोंदविण्यात आल्या. तथापि यापैकी अवघ्या १६ हजार जणांवरच आरोप सिद्ध होऊन त्यांना तुरुंगाची हवा खावी लागल्याचे निराशाजनक चित्र समोर आले आहे.

राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार २०११ मध्ये देशात बलात्काराचे २४ हजार २०६ गुन्हे नोंदविण्यात आले. यापैकी केवळ पाच हजार ७२४ जणांनाच शिक्षा ठोठावण्यात आली. त्यामागील २०१० या वर्षात बलात्काराच्या २२ हजार १७२ घटना घडल्या. एवढ्या आरोपींपैकी अवघ्या पाच हजार ६३२ जणांनाचा तुरुंगाची हवा खावी लागली. सन२००९ मध्ये या घटनांचे प्रमाण २१ हजार ३९७ एवढे होते. त्यापैकी पाच हजार ३१६ जणांवरील आरोप सिद्ध होऊन त्यांना गजाआड जावे लागले, असे ही आकडेवारी सांगते.

या काळात मध्यप्रदेशमध्ये सर्वाधिक म्हणजे नऊ हजार ५३९ बलात्काराचे खटले चालले. त्यापैकी अवघ्या दोन हजार ९८६ जणांनाच दोषी ठरवून शिक्षा दिली गेली. तुलनेने गुन्हेगारीचे प्रमाण जास्त असलेल्या उत्तरप्रदेशमध्ये घडलेल्या अशा पाच हजार ३६४ घटनांपैकी तीन हजार ८१६ जणांना त्यांच्या या कृत्याबद्दल शिक्षा भोगावी लागली.

दरम्यान, बलात्कारांच्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांचा अपुरा तपास आणि सरकारी पक्षाचे आरोपीविरुद्ध पुरेसे पुरावे सादर करण्यात आलेले अपयश यामुळे या प्रकरणात शिक्षा होण्याचे प्रमाण कमी असल्याचे गृहमंत्रालयाच्या अधिकार्‍याने सांगितले.

संपूर्ण देशात बलात्काराबरोबरच विनयभंगासारख्या प्रकारातही शिक्षा होण्याचे प्रमाण कमी असल्याचे आढळून आले आहे. सन २००९ ते २०११ या तीन वर्षांमध्ये देशात घडलेल्या विनयभंगाच्या सुमारे एक लाख २२ हजार २९२ गुन्ह्यांपैकी केवळ २७ हजार ४०८ जणांना शिक्षा झाली. महाराष्ट्रात याच काळात विनयभंगाच्या सुमारे १० हजार ६५१ घटना घडल्या. त्यापैकी केवळ ५९५ जणानांच शिक्षेला सामोरे जावे लागले. याच काळात उत्तर प्रदेशसारख्या राज्यात नऊ हजार ३० विनयभंगाच्या गुन्ह्यांपैकी सुमारे सात हजार ९५८ जणांना शिक्षा ठोठावण्यात आली हे विशेष.

Leave a Comment