ओबामांचे शूटिंग करतानाचे फोटो प्रसिद्ध

वॉशिग्टन दि.४ – दुसरयादा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतानाच राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी अमेरिकेत बंदुकींवर बंदी आणण्याचा अजेंडा सर्वाधिक महत्त्वाचा ठरविला आहे. मात्र या बंदीबाबत त्यांना अनेक थरांतून विरोध होत असल्याने व्हाईट हाऊसने ओबामा यांचे स्कीट निशाणेबाजीचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. ओबामा यांनाही निशाणेबाजी आवडते, त्यांनाही त्यात रस आहे मात्र तरीही बंदुकींवर बंदी गरजेची आहे असा संदेश या फोटोतून देण्याचा प्रयत्न केला जात आहे असे सांगण्यात येत आहे.

डिसेंबर १४, २०१२ मध्ये कनेक्टीकटच्या न्यू टाऊन शाळेत एका माणसाने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात २० लहान मुले तर ६ मोठी माणसे मृत्युमुखी पडली होती. त्यानंतरच ओबामा यांनी बंदुकींवर बंदी आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून आज म्हणजे सोमवारी ते त्यासंबंधी आपली योजना मान्य व्हावी यासाठी काँग्रेसला अपील करणार आहेत. असॉल्ट रायफल्स आणि जादा क्षमतेची काडतुसे यावर बंदी आणण्यासाठी ओबामा प्रयत्नशील आहेत.

मात्र राष्ट्राध्यक्षांच्या या निर्णयावर देशातील बंदूक उत्पादक कंपन्यांची लॉबी, राजकारणी नेते, टीकाकार आणि बंदुकींचे मालक यांच्याकडून ओबामांना तीव्र विरोध सहन करावा लागत आहे. अशी बंदी म्हणजे अमेरिकन नागरिकाच्या कायदेशीर हक्कांचे उल्लंघन असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.

Leave a Comment